घरCORONA UPDATEशरद पवारांची इच्छा असेल तरच हे सरकार पडेल - अनिल गोटे

शरद पवारांची इच्छा असेल तरच हे सरकार पडेल – अनिल गोटे

Subscribe

सत्ता गमावल्यामुळे भाजपच्या नेत्यांचे ताळतंत्र बिघडले आहे. काँग्रेस-शिवसेनेला एकत्र आणून शरद पवारांनी हे सरकार स्थापन केलेले आहे. त्यामुळे त्यांची इच्छा असेल तरच हे सरकार पडेल. अन्यथा सत्तेचा हा गोवर्धन तसूभर हलणार नाही. भाजपचे वाचाळ महाविकास आघाडीची एक विटही हलवू शकले नाही, असा दावा भाजपचे माजी नेते आणि सध्या राष्ट्रवादीत असलेले माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. तसे त्यांनी एक पत्रकच काढले आहे.

अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपने आकाशपाताळ एक करुन पंतप्रधानांसह सर्व नेत्यांच्या सभांचे आयोजन करुनही केवळ १०५ वर त्यांची गाडी अडकली. भाजपच्या एकाही नेत्याला कुणी गांभीर्याने घेत नाही. कहर म्हणजे भाजपकडून सरकार पाडण्याच्या तारखा देण्यात येतात. मात्र हे सरकार शरद पवारांच्या इच्छेशिवाय पडणार नाही. उलटपक्षी अकारण रोज उठून शासनावर टीका करायची आणि आघाडीच्या नेत्यांविरोधात बरळत राहायचे, अशा नियोजनशुन्य राजकीय बालिशपणामुळे भाजपला कुणीही गांभीर्याने घेत नसल्याचा टोला गोटे यांनी या पत्रकातून लगावला आहे.

- Advertisement -
Anil Gote Letter
माजी आमदार अनिल गोटे यांनी लिहिलेले पत्र – पान १

अनिल गोटे हे आपल्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रचलित आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यामुळे ते शरद पवार यांच्याविषयी कौतुकाचे दोन शब्द बोलत आहे का? अशी शंका घ्यायला जागा आहे. कारण भाजपमध्ये असताना देखील त्यांनी शरद पवारांविषयी असेच पत्रक काढले होते. “असा नरपुंग गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही” अशा आशयाच्या त्या पत्रात त्यांनी पवारांविरोधात जोरदार टीका केली होती. तसेच विधानसभेत देखील अनेकदा ते राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भिडायचे. मात्र आता राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांनी पक्षाशी जुळवून घेतल्याचे दिसते.

Anil Gote Letter 2
माजी आमदार अनिल गोटे यांनी लिहिलेले पत्र – पान २

कोण आहेत अनिल गोटे

अनिल गोटे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पर्वी २०१४ साली ते भाजपच्या तिकीटावर धुळे येथून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र २०१९ ला त्यांनी भाजपला राम राम ठोकला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले गोटेंनी १९६५ पासून जनसंघाचे काम करायला सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी १९९३ मध्ये स्वतःचा समाजवादी जनता पक्ष महाराष्ट्र असा पक्ष स्थापन केला होता. १९९८ मध्ये पक्षाचे नाव बदलून लोकसंग्राम पक्ष असे ठेवले.

- Advertisement -

१९९९ साली लोकसंग्रामच्या माध्यमातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००९ साली दे दुसऱ्यांदा लोकसंग्रामच्या माध्यमातून निवडून आले. २०१४ साली भाजपकडून निवडून आले. तर २०१९ साली त्यांचा पराभव झाला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -