घरमहाराष्ट्रघरगुती कचर्‍यापासून खतनिर्मितीचा मार्ग !

घरगुती कचर्‍यापासून खतनिर्मितीचा मार्ग !

Subscribe

मुंबई महापालिकेच्यावतीने ओल्या व सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण करून ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी खत निर्मिती करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न सुरु असला तरी त्याला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वत:च्या कर्मचार्‍यांपासूनच कचर्‍याची विल्हेवाट लावण्यास भाग पाडले जाणार आहे. के-पश्चिम विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांना घरच्या घरी ओल्या कचर्‍यापसून खतनिर्मितीसाठी बास्केटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या बास्केटच्या माध्यमातून कर्मचारी आपल्या घरीच खतनिर्मिती करुन सामान्य जनतेसमोर एक आदर्श निर्माण करतील, अशी आशा आहे.

मुंबईत दरदिवशी निर्माण होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात येणार्‍या डम्पिंग ग्राऊंडची क्षमता आता संपत चालली असून एकट्या कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरच सर्व भार पडणार आहे. त्यामुळे कमीत कमी कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जावा, यासाठी कचर्‍याची विल्हेवाट स्थानिक पातळीवर केली जावी, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. यासाठी कचर्‍याचे वर्गीकरण करून ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती तर सुक्या कचर्‍याचा पुनर्वापर करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासन नागरिकांना आवाहन करत त्यासाठी प्रवृत्त करत आहे.

- Advertisement -

मुंबईतील अनेक सोसायट्यांनी काही प्रमाणात कचर्‍याची विल्हेवाट लावण्यास तयारी दर्शवली असली तरी त्याला चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकांना जनजागृती करणार्‍या अधिकार्‍यांपासूनच खतनिर्मिती करण्यास महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी के-पश्चिम विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या २५ कनिष्ठ आवेक्षक तसेच मुकादमांसह सुपरवायझरर यांना एन्व्हायरन एक्ट कन्सल्टन्सी या संस्थेच्या माध्यमातून घरच्या घरी खतनिर्मिती करण्यासाठी बास्केटचे वाटप करण्यात आले.

के-पश्चिम विभागात नागरिकांना खतनिर्मिती करिता स्वकृतीतून प्रोत्साहित करण्याकरिता सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त (परिमंडळ-4) रणजित ढाकणे यांच्या हस्ते या कर्मचारी व अधिकार्‍यांना बास्केटचे वाटप करण्यात आले. नागरिकांना कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी खतनिर्मिती करण्याचे आवाहन महापालिकेचे अधिकारी करत असतात. परंतु बर्‍याच वेळा नागरिकांकडून तुम्ही तुमच्या घरी तरी कचर्‍याची विल्हेवाट लावतात का, असा सवाल करतात. त्यामुळे कर्मचार्‍यांना स्वत:च्या घरापासून कचर्‍याची विल्हेवाट लावून खतनिर्मिती करता यावी आणि जनतेसमोर मोठ्या विश्वासाने त्यांना जाता यावे, यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली आहे. सध्या २५ कर्मचारी व अधिकार्‍यांना या बास्केटचे वाटप केले आहे.

- Advertisement -

तसेच के-पश्चिम कार्यालयातील उपहारगृहातील कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्यासाठी बास्केट उपलब्ध करून देण्यात आले. हा ओल्या कचर्‍यापासून खत निर्मितीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास सीएसआर निधीतून विभागातील गृहनिर्माण सोसायट्यांना कचर्‍यापासून खत निर्मिती करण्यासाठी बास्केटचे वाटप करण्यात येईल,असे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी स्पष्ट केले. या बास्केटच्या वापराबाबत एन्व्हायरन एक्ट कन्सल्टन्सी या संस्थेच्या समजुक्ता मोकाशी यांनी मार्गदर्शन केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कचर्‍या पेट्यांबरोबरच आता खतनिर्मिती पेट्या

मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांसाठी दैनंदिन कचर्‍याचे वर्गीकरण करून तो गोळा करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना १२० ते २४० लिटर क्षमतेच्या एच.डी.पी.ई कचरा पेट्या या नगरसेवक निधीतून महापालिकेकडून पुरवल्या जातात. आता त्याच धर्तीवर ओल्या कचर्‍यापासून आवारात खत निर्मिती प्रकल्प राबवण्याकरता खतनिर्मिती पेट्या महापालिकेच्यावतीने पुरवण्यात येणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. याबाबत प्रक्रिया लवकरच करून नगरसेवक निधीतून खत निर्मिती पेट्यांची खरेदी करून जनतेसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जेणेकरून नागरिकांना ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावतानाच त्यातून खत निर्मिती करणे सोपे जाईल,असे त्यांनी सांगितले. कचरा विल्हेवाटीचे विकेंद्रीकरण करताना कचर्‍याच्या विघटनावर अधिक भर दिला जाणार असल्याचेही काकाणी यांनी स्पष्ट केले. लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करून त्यांना कचर्‍यापासून खत निर्मिती करून कचर्‍याची विल्हेवाट घरापासून लावण्यास प्रवृत्त केले जाणार आहे, हेच आपले प्रमुख लक्ष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -