घरमहाराष्ट्रमविआचा फॉर्म्युला फिक्स? लोकसभेसाठी जागावाटप ठरले, शिक्कामोर्तब बाकी - सुप्रिया सुळे

मविआचा फॉर्म्युला फिक्स? लोकसभेसाठी जागावाटप ठरले, शिक्कामोर्तब बाकी – सुप्रिया सुळे

Subscribe

महायुतीत जागावाटपाबाबत चर्चाच नाही - सुनील तटकरेंचा दावा

विरोधकांच्या इंडिया आघाडीत कुठला पक्ष असणार आणि कुठला नसणार यावर अंतिम निर्णय झालेला नसताना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे फुगे शिवसेनेसह (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्यांकडून हवेत सोडले जात आहेत. सोमवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून त्यावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे सांगितले, तर याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आतापर्यंत २३ जागा लढत आली आहे. लोकसभा निवडणुकीत ४८ जागांवर मेरिटच्या आधारावर जागावाटप होईल, असे सांगितले होते. दुसरीकडे महायुतीत जागावाटपाबाबत अजून चर्चाच झाली नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. अनौपचारिक पद्धतीने त्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. केवळ त्याची अधिकृत घोषणा करणे बाकी आहे. येत्या ८-१० दिवसात त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आंबेडकर कुटुंबाचे मोठे योगदान आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर संविधान आणि देश वाचवण्यासाठी काम करीत आहेत. प्रकाश आंबेडकर यांची इंडिया आघाडीत महत्त्वाची भूमिका राहील. नव्या पिढीलाही त्यांनी मार्गदर्शन केले पाहिजे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक असल्याने हे वर्ष राज्य आणि देशासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे देशातील निवडणुका संविधानाप्रमाणे आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, अशी अपेक्षाही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.

देशात कुणाचीही सत्ता असूदे, पण तो संविधानाप्रमाणे सत्तेत आलेला असावा. महाविकास आघाडीत १५ ते १६ जानेवारीपर्यंत कोण कुठल्या जागेवरून लढणार हे स्पष्ट होईल. त्यानंतर उमेदवार निश्चित केले जातील. इंडिया आघाडीत प्रत्येक राज्यासाठी वेगळा निर्णय असेल.
-सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisement -

आम्ही ४५ प्लस जागा लढवण्याचे उद्दिष्ट ठेवूनच लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. १४ जानेवारीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात महायुतीचा कोकण मेळावा होईल. त्यावेळी जागावाटपासंदर्भात चर्चा होणार असण्याची शक्यता आहे.
-सुनील तटकरे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

आमच्या फॉर्म्युल्यावर ते बोलायला तयार नाहीत – प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला लोकसभेच्या प्रत्येकी १२ जागांचा फॉर्म्युला दिला आहे. आम्ही दिलेला फॉर्म्युला सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का हे त्यांनाच विचारा. महाविकास आघाडीने या काळात ४० वेळा बैठका घेऊनही ४८ जागांचे वाटप होत नसल्याने वेगळ्या चर्चांना सुरुवात होत असल्याचे आंबेडकर म्हणाले. आम्ही त्यांच्या निरोपाची शेवटपर्यंत वाट पाहू. त्यानंतर नाइलाजाने आम्हाला आमचे उमेदवार उभे करावे लागतील. केवळ शिवसेनेबरोबर आमची युती झाली तर अर्ध्या-अर्ध्या जागा आम्ही लढवू,असेही त्यांनी सांगितले.

कुणाला किती जागा मिळणार?
मविआच्या फार्म्युल्यानुसार महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ठाकरे गटाला १८-१९, काँग्रेसला १३, शरद पवार गटाला १०, वंचित आघाडीला २, स्वाभिमानी शेतकरी पक्षाला २, तर बहुजन विकास आघाडीला १ जागा देण्याचे ठरले आहे. २ ते ३ जागांवर अंतिम चर्चा सुरू असून त्यानंतर जागावाटपाची अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उद्धव ठाकरेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत फोनवरून चर्चा?
भाजपविरोधात एकत्रित लढताना जागावाटपावरून मतभेद होऊ नयेत म्हणून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत फोनवरून चर्चा केल्याचे समजते. लवकरच उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -