घरमहाराष्ट्रमकरसंक्रांतीला गोड कसे बोलणार?

मकरसंक्रांतीला गोड कसे बोलणार?

Subscribe

हलव्याचे दागिने, तिळगुळ महागले

मकरसंक्रात हा सण आला की महिला वर्गात दोन गोष्टीची चर्चा हमखास रंगते. ती म्हणजे हलव्याचे दागिने आणि तिळाचे लाडू. यंदा बाजारपेठेत या दोन्ही गोष्टींची रेलचेल पाहायला मिळत आहे. मात्र यंदा हलव्याच्या दागिन्यांसह तिळगुळदेखील महागले आहेत, त्यामुळे येणार्‍या मकरसंक्रातीला तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असे बोलताना खिसा बराच खाली करावा लागणार आहे.

नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालण्याची परंपरा आहे. लहान मुलांनाही हे दागिने घातले जातात. या दिवशी नववधू आणि बालकांना हलव्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही संक्रातीच्या काळात काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याच्या दागिन्यांना बरीच मागणी आहे. यंदा हे दागिने बनवणार्‍या मजुरांनी त्यांची मजुरी वाढवल्याने दागिन्यांच्या दरात वाढ झाली आहे. हलव्याच्या दागिन्यांकरता लागणार्‍या सजावटीचे साहित्य महाग झाल्याने त्याचा परिणाम या दागिन्यांच्या दरावर झाला आहे.

- Advertisement -

लहान मुलांसाठी बाळकृष्णाचे दागिने तसेच नववधूसाठी मेखला, कंबरपट्टा, मंगळसूत्र, बांगड्या, चिंचपेटी, तोडे, केसातील गजरे, अंगठी आणि नथ यांसारखे हलव्याचे दागिने बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या दागिन्यांची किंमत हजार रुपये असून नववधूसाठी लागणारे दागिने १ हजार ८०० रुपयांना विकले जात आहेत. लहान मुलं, नववधूसह पुरूषांचेदेखील हलव्याचे दागिने बाजारात पाहायला मिळतात. यामध्ये हलव्याचे हार-गुच्छ, घड्याळ आणि मोबाईल तयार केले जात असून यंदा त्यांचे दर १ हजार २०० रूपये अशा किंमतीला विकले जात आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या किमती वाढल्या असल्याची माहिती कल्याणच्या हलव्याचे दागिने तयार करणार्‍या सुरेखा खरे यांनी दिली.‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’, असे बोलताना मात्र तिळगुळ महागल्याने किरकोळ बाजारातील तिळाची किंमत वाढल्याने यंदा सामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या घाऊक बाजारात तिळाला प्रति किलो १५० ते १६० रूपये दर असून किरकोळ बाजारात १८० रूपये किलोने मिळत आहे. तिळाच्या उत्पादनात घट झाल्याने यंदा तिळाच्या दरात किलोमागे २५ ते ३० रूपयांनी वाढ झाली आहे. तर चिक्कीच्या गुळाचे दर घाऊक बाजारात ४५ ते ५० रूपये असून किरकोळ बाजारात हाच गुळ ६० रूपये किलोने विकला जात आहे, असे राजू भाटिया या विक्रेत्याने सांगितले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -