घरमुंबईदादरमध्ये फेरीवाल्यांना अधिकार्‍यांचे अभय!

दादरमध्ये फेरीवाल्यांना अधिकार्‍यांचे अभय!

Subscribe

फेरीवाल्यांवर कारवाई करताना मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुजाभाव केला जात असल्याचा प्रकार दादरमध्ये दिसून येत आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात असली तरी दादरमध्ये ही कारवाई केवळ फार्स असल्याचे स्पष्ट होत आहे. दादर रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात फेरीवाले नसावेत, असे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असताना, अधिकारी जाणीवपूर्वक फेरीवाल्यांना संरक्षण देत आहेत. रानडे मार्गावरील दीडशे मीटर परिसरातील एका बाजूला व्यावसाय करणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाई करून दुसर्‍या बाजूला बसणार्‍या फेरीवाल्यांना अभय दिले जात असल्याचे कारवाईदरम्यान स्पष्ट दिसून येत आहे.

फेरीवाल्यांना जाणीवपूर्वक अभय?

न्यायालयाच्या निर्देशांनुसार, रेल्वेस्थानकापासून दीडशे मीटर आणि मंडईपासून शंभर मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यावसाय करण्यास बंदी आहे. त्यामुळे दादर रेल्वेच्या पश्चिम बाजूस फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी असून त्यानुसार महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्या वतीने फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. परंतु, शनिवारी दुपारी चारच्या सुमारास जी-उत्तर विभागाची चोर गाडी रानडे मार्गावरून फिरुन त्यांनी फेरीवाल्यांचे सामान जप्त केले. ही कारवाई करताना ज्या फेरीवाल्यांसाठी अधिकार्‍यांनी दीडशे मीटरची रेषा शंभर मीटरवर आणली, त्या भागातील फेरीवाल्यांना जाणीवपूर्वक अभय देऊन दुसर्‍या पदपथावर असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असल्याचे निदर्शनास आले.

- Advertisement -

एकावर कारवाई, दुसऱ्याला सूट?

दादर रेल्वे स्थानकापासून सावरकर मंडई आणि नक्षत्र मॉलची संरक्षक भिंतीच्या समांतर रेषा ही १५०मीटरची आहे. परंतु, ही रेषा बदलून अधिकार्‍यांनी शंभर मीटरवर आणली. त्यामुळे शनिवारी दुपारी जेव्हा ही गाडी रानडे मार्गावरून जात होती, त्यावेळी त्यांनी दीडशे मीटरच्या आतील परिसरात असलेल्या नेमक्याच फेरीवाल्यांवर कारवाई केली. या गाडीमध्ये तेव्हा खुद्द जी-उत्तर विभागाच्या परवाना खात्याचे वरिष्ठ निरिक्षक भोसले उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी डॉलर दुकानापासून ते आदर्श हॉटेलच्या समोरील फेरीवाल्यांवर कारवाई केली नाही. कारवाई सुरु असताना हे फेरीवाले जागीच बसून होते. तर विरुद्ध दिशेला असलेल्या पदपथावरील सावरमंडईच्या प्रवेशद्वारापासून ते ए. जे. जिन्सच्या दुकानापर्यंत असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु होती. एकाच पट्टयात असलेल्या या दोन्ही पदपथांपैकी एका पदपथावरील फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, परंतु दुसर्‍या पदपथावरील फेरीवाल्यांना परवाना विभागाचे वरिष्ठ अधिकारी रवींद्र भोसले हे अभय देत असल्याचे पाहणीमध्येच दिसून आले. त्यामुळे दादरमधील फेरीवाल्यांची कारवाई हा केवळ फार्सच असून मर्जीतील फेरीवाल्यांना संरक्षण देवून इतरांवर कारवाई होत असल्याचं दिसून येत आहे.

दिघावकरांच्या येण्याचा परिणाम नाही

जी/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदाची सूत्रे किरण दिघावकर यांनी स्वीकारल्यानंतर दादरमधील फेरीवाल्यांवरील कारवाई प्रामाणिकपणे पार पडेल असे बोलले जात होते. परंतु दिघावकर यांनी फेरीवाल्यांच्या कारवाईकडे दुर्लक्ष केल्याने परवाना विभागाचे वरीष्ठ निरिक्षक हे फेरीवाल्यांच्या काही दलालांना हाताशी धरुन फेरीवाल्यांना संरक्षण देत असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -