राज्यपाल भाजपच्या शिष्टमंडळाला भेटले पण महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टळणार

MVA Leaders will not meet the Governor Bhagat Singh Koshyari to visit Dehradun till March 28
राज्यपाल २८ मार्चपर्यंत देहरादूनला; महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टळणार

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी मंगळवारी भाजपच्या शिष्टमंडळाला भेटले पण महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टळणार आहे. महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र, राज्यपाल देहरादूनला गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट टळणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार होते.

बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत फोन टॅपिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप यावर चर्चा करण्यात आली. फोन टॅपिंग प्रकरण आणि गृहमंत्र्यांवरील आरोपांमध्ये किती तथ्य आहे, याची माहिती राज्यपालांना देण्यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र, राज्यपाल देहरादूनला गेले आहेत. राज्यपालांचा पूर्वनियोजित दौरा होता, ते देहरादूनला आहेत. २८ मार्चला मुंबईत परतणार आहेत, अशी राजभवनाने माहिती दिली आहे.

भाजपचे शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

भाजपचे शिष्टमंडळ मुंबईतील राजभवनात मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा हे नेते सहभागी आहेत. जवळपास तासाभर भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांची खलबतं सुरु होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर टीका केली.


हेही वाचा – गृहमंत्री अनिल देशमुख देणार राजीनामा? निष्पक्ष चौकशीसाठी लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र