घरमहाराष्ट्रनाशिकमराठा हायस्कूलच्या १९९२ बॅचचे स्नेहसंमेलन अन् धमाल मस्ती

मराठा हायस्कूलच्या १९९२ बॅचचे स्नेहसंमेलन अन् धमाल मस्ती

Subscribe

बुस्टर डोस देणारे स्नेहसंमेलन

नाशिक : मखमलाबाद येथील कककेफिनी रेस्टॉरंटची हिरवळ.. मराठा हायस्कूलच्या दगडी इमारतीचा ब्रॅक ड्रॉप… पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्टवाला विद्यार्थी अन् निळ्या गणवेशातील विद्यार्थीनीचा कट आऊट… त्यामागे उभे राहणारे पंचेचाळीशीचे ‘विद्यार्थी’… वय, पद, हुद्दा, आर्थिक परिस्थिती, ताणतणाव या सार्‍या बाबींना बाजूला सारत मनसोक्तपणे केलेली धमाल… स्ट्रॉ केसात माळणे, काडेपेट्यांची रास, दमशराज यांसारखे गेम आणि अधूनमधून होणारी १९९० च्या सदाबहार गाण्यांची धमाल अशा मंतरलेल्या वातावरणात मराठा हायस्कूलच्या १९९२ च्या बॅचचे स्नेहसंमेलन रंगले.

तीस वर्षांपूर्वीच्या शाळेच्या, शिक्षकांच्या आठवणीत रममाण होत उपस्थितांचा दिवस कसा सरला ते देखील कळले नाही. या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थी जुन्या आठवणींत रममाण झालेले दिसून आले. स्नेहसंमेलनाची संकल्पनाच शाळेत आल्याचा भास निर्माण करीत होती. शाळेची पहिली घंटा वाजल्यानंतर विद्यार्थी वर्ग त्यावेळीच्या तुकड्यांनुसार रांगांमध्ये उभा राहिला दुसरी घंटा झाल्यानंतर ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना म्हटली गेली. त्यानंतर प्रतिज्ञा म्हणत देशाप्रती प्रेमही व्यक्त करण्यात आले. अर्थात प्रतिज्ञा म्हणतांना हातांना कळ लागली ही बाब अलहिदा. परंतु त्याचवेळी पुढे उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या खांद्याचा टेकू घेण्याचे कौशल्यही काहींनी अजमावले. प्रार्थना आणि प्रतिज्ञेची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा नामोल्लेख करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी वातावरण काहीसे भारावले होते. यावेळी आपले दिवंगत शिक्षक आणि सहकार्‍यांना आठवतांना अनेकांचे डोळे पाणावले होते. परंतु कुणालाही कळू न देता ओलावलेले पापण्या पुसत पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी माजी विद्यार्थीनींसाठी ‘फॅशन शो’ घेण्यात आला. त्यात दिलेले स्ट्रॉ कमी वेळेत केसांमध्ये माळणे आणि त्यानंतर थाटात रॅम्प वॉक करण्याचा ‘जलवा’ दाखवण्यात आला. रॅम्प वॉक करतांना माजी विद्यार्थीनींच्या चेहर्‍यावरचा आनंद अवर्णनिय असाच होता. या खेळानंतर माजी विद्यार्थ्यांचे कसब पणाला लागले. आईस ब्रेकिंग खेळात डाव्या आणि उजव्या बाजूकडे कंबर झुकवतांना अनेकांना ‘कंबरडे मोडणे’ हा वाक्प्रचार कशासाठी वापरतात याची अनुभूती आली. या खेळातून जो ‘आऊट’ होईल त्याला नाचण्याची शिक्षा देण्यात येत होती.

ही शिक्षा तो अतिशय तन्मयतेने आणि आनंदाने ‘एन्जॉय’ केली जात होती. दमशराज खेळात उपस्थितांच्या अभिनयाचे कसब पणाला लागले. तर अंतर्‍यावरुन मुखडा ओळखतांना होणारी धावपळ, उडणारा गोंधळ, ऐनवेळी विसरले जाणारे शब्द, छोटेखानी भांडणे यामुळे धमाल उडत होती. या सर्व खेळांच्या माध्यमातून समूह भावनेचा विजय कसा होतो याचा चांगला संदेशही मिळत होता. जेवणाचा अस्वाद घेतल्यानंतर गाणे गाण्यापासून नृत्य करण्यापर्यंतचा मनसोक्त आनंद लुटण्यात आला. सायंकाळचे पाच वाजले आणि मग स्नेह संमेलनाच्या समारोपाची सार्‍यांनाच चाहूल लागली. ‘तेरा जैसा यार कहा, कहा ऐसा याराना’ या गिताच्या पार्श्वभूमीवर एकमेकांचा निरोप घेतांना अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या.

- Advertisement -

बुस्टर डोस देणारे स्नेहसंमेलन

अनेक दिवसांनंतर कौटुंबिक आणि व्यावसायिक व्यवधाने बाजूला सारत केवळ स्वत:साठीच वेळ देण्याची ही संधी गमवण्याची कुणाचीही तयारी नव्हती. दोन वर्षांच्या कोविड काळात अनेकांवर मोठी संकटे आलीत. या संकटांमुळे विशेषत: महिला वर्ग काहिसा नैराश्याने ग्रासलेला होता. अशा माजी विद्यार्थ्यांसाठी हे स्नेह संमेलन ‘बुस्टर डोस’ देणारे ठरले. संबंधित माजी विद्यार्थ्यांनी तशा भावनाही व्यक्त केल्या.

व्हिडिओ कॉलवरुन आस्वाद

काही माजी विद्यार्थ्यांना काही कारणास्तव स्नेहसंमेलनास उपस्थित राहता आले नाही. अशा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉल करुन स्नेह संमेलनाचा आस्वाद लुटला.

शिक्षकांच्या आठवणी

एन. आर. भोसले सरांची छडी, अथरे सरांची शिस्त, उशिर सरांची धास्ती, पवार मॅडमचा मायेचा हात, देवरे मामांनी दिलेली घंटा आणि शाळा सुटल्यावरचा भांडण अन् तंटा या सार्‍या आठवणींना स्नेह संमेलनाच्या निमित्ताने उजाळा देण्यात आला. आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करतांनाच त्यांच्या आदर्शाच्या जोरावरच आपली प्रगती होत असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी अभिमानाने सांगितले.

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -