घरमहाराष्ट्रनाशिकभक्ष्याच्या शोधात भटकणारा बिबट्या अडकला संरक्षक तार कुंपणात

भक्ष्याच्या शोधात भटकणारा बिबट्या अडकला संरक्षक तार कुंपणात

Subscribe

दिंडोरी : भक्ष्याच्या शोधात भटकंती करणारा बिबट्या मोहाडी साकोरे मिग शिवारातील एचएएलच्या जंगलात धावण्याचा प्रयत्नात असताना भिंतीच्या भगदाडातून बाहेर पडला आणि संरक्षक तारेच्या कुंपणात अडकला. धारधार तारांचा फास पायांभोवती अडकल्याने बिबट्या स्वत:ची सुटका करू शकत नव्हता. यावेळी त्याने जोरजोराने डरकाळ्या फोडल्याने परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच पूर्व वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेत यशस्वीरित्या बिबट्याची सुटका केली.

मौजे मोहाडीच्या शिवलगत एचएएलच्या संरक्षक भिंतीच्या भगदाडातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आत शिरलेला बिबट्या तारेच्या कुंपणात अडकून पडल्याची घटना मंगळवारी (दि.२३) घडली. याबाबत शेतकर्‍यांनी वनखात्याला सकाळी सात वाजेच्या सुमारास माहिती कळविली. सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे यांनी त्वरित सुत्रे हलवत दिंडोरीचे वनक्षेत्रपाल पूजा जोशी, नाशिकचे विवेक भदाणे, चांदवडचे वनक्षेत्रपाल एस.बी. वाघमारे यांना सोबत घेत वनपाल, वनरक्षकांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी इको-एको वन्यजीव संस्थेचे स्वयंसेवकदेखील वनखात्याच्या मदतीला धावले.
बिबट्या पूर्णपणे शुद्धीवर असल्याने त्याला सुरक्षितरित्या तारेतून काढणे अशक्य होते. यामुळे पशुवैद्यकिय अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार वनअधिकार्‍यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्याचा निर्णय घेतला. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी त्याला भुलीचे इंजेक्शन दिले. तो बेशुद्ध पडताच तारेच्या विळख्यातून त्याला मुक्त करत सुरक्षितरित्या पिंजर्‍यात ठेवण्यात आले. तातडीने त्यास वैद्यकीय उपचारासाठी चांदवडला हलविण्यात आले.

- Advertisement -

चार वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती

जानोरी, मोहाडी, साकोरे मिग, उमराळे, ननाशी या गावांच्या परिसरात बिबट्यांचा संचार आढळतो. भक्ष्याच्या शोधात बिबटे मळे भागात रात्री भटकंती करत असतात. एचएएलच्या जंगलाचे क्षेत्रही बिबटप्रवण आहे. २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात अशाच प्रकारे एक बिबट्या येथील भिंतीच्या भगदाडाला लागून असलेल्या कुंपणात अडकून गंभीर स्वरुपात जखमी होऊन मृत्युमुखी पडला होता. तेव्हाही वनखात्याच्या पथकाने त्यास रेस्क्यू केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -