घरक्राइमबोगस प्रमाणपत्र प्रकरण : डॉ. सैंदाणेंसह ठाकरेची पोलीस कोठडीत रवानगी

बोगस प्रमाणपत्र प्रकरण : डॉ. सैंदाणेंसह ठाकरेची पोलीस कोठडीत रवानगी

Subscribe

डॉ. स्वप्निल सैंदाणेंसह साथीदार ठाकरेला पोलीस कोठडी, अटकपूर्व जामीन अर्जावर उच्च न्यायालयात ६ ऑक्टोबरला होणार सुनावणी

नाशिक : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणात सातपूरमधील प्रभावती हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल सैंदाणे यांच्यासह साथीदार विवेक ठाकरे (रा. शहादा) यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक करत बुधवारी (दि.२८) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच, डॉ. निखिल सैंदाणे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीसह पोलीस आणखी कोणाला ताब्यात घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंतरजिल्हा बदलीसाठी मुंबई, पालघर आणि जळगाव जिल्ह्यातील २१ पोलीस अंमलदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, नाशिककडे अर्ज सादर केले होते. या अर्जांमध्ये बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अर्जदार पोलीस अंमलदारांनी त्यांचे नातेवाईकांचे गंभीर आजार असल्याचे बनावट प्रमाणपत्र नाशिक जिल्हा रुग्णालय व धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी खगेंद्र टेंभेकर यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाशिक तालुका पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिसांना २० जणांचे अर्जांना जोडलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले. बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रावर स्पंंदन (प्रभावती) हॉस्पिटल, सातपूर, साईछत्र हॉस्पिटल, नाशिक, गणेश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक व सहजीवन हॉस्पिटल, अंबडची नावे आहेत.

- Advertisement -

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने डॉ. स्वप्निल सैंदाणे यास मंगळवारी (दि.२७) सायंकाळी खापर (ता.अक्कलकुवा, जि. नंदूरबार) येथून ताब्यात घेतले. ते पोलिसांच्या जाळ्यात आल्याने बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणातील वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टर, कर्मचारी व एजंटाचे धाबे दणाणले आहेत. सहजीवन रुग्णालयाच्या नावे अहवाल देणारा व्यवस्थापक संशयित वीरेंद्र यादव याच्याही मागावर नाशिक ग्रामीण पोलीस आहेत. त्यामुळे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, आरोपींची संख्याही वाढणार आहे. पोलीस बोगस प्रमाणपत्राशी संबंध असलेल्यांचा शोध घेत असल्याने एजंटांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस तपासात उघडकीस आलेली माहिती
  • डॉ. स्वप्निल सैंदाणे यांची बी. ए. एम. एस. ची पदवी असली तरी त्यांनी एम. एस. सर्जन असल्याचे दाखवून चार खासगी रुग्णालयांच्या नावे बनावट प्रमाणपत्रे दिली.
  • डॉ. सैंदाणे यांचे एम. एस. सर्जन असल्याचा बनावट शिक्का २१ अर्जदारांपैकी ११ जणांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांवर मारल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
  • प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी डॉ. सैंदाणेंचा साथीदार विवेक ठाकरे याने मदत केली.
  • वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी वापरलेला एम. एस. सर्जन शिक्का, संगणक, लॅपटॉप, प्रिंटरसह कागदपत्रे पोलीस जप्त करणार आहेत.
  • डॉ. स्वप्निल सैंदाणेंच्या तपासात बोगस प्रमाणपत्रांसंदर्भात आणखी माहिती मिळू शकते, यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे ७ दिवसांची कोठडी मागितली.
  • न्यायालयाने डॉ. स्वप्निल सैंदाणे व साथीदार विवेक ठाकरे यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपींच्या मदतीने सूत्रधारांचा शोध

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक हिरा रवींद्र कनोज (वय ५७, रा.म्हसरुळ), जिल्हा रुग्णालयातील लिप्टमन कांतीलाल रामभाऊ गांगुर्डे (वय ५७, रा.गोवर्धन, जि.नाशिक), डॉ. स्वप्निल सैंदाणे व त्याचा साथीदार विवेक ठाकरे अडकले आहेत. न्यायालयाने हिरा कनोज व कांतीलाल गांगुर्डे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सखोल तपासाठी हिरा कनोज यांची पोलीस कोठडी मागितली. तर डॉ. स्वप्निल सैंदाणे व विवेक ठाकरे यांची पोलीस चौकशी करत आहेत. या चौघांच्या चौकशीतून पोलीस सूत्रधारांचा शोध घेत असून, पुरावे गोळा करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -