घर उत्तर महाराष्ट्र चाहूल गणेशोत्सवाची : नाशिकरोडच्या गणेशोत्सवाला बंदीजनांचा परीसस्पर्श

चाहूल गणेशोत्सवाची : नाशिकरोडच्या गणेशोत्सवाला बंदीजनांचा परीसस्पर्श

Subscribe

नाशिक : नाशिकरोड स्थित मध्यवर्ती कारागृहाच्या कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांच्या संकल्पनेतून कारागृहातील बंदीजनांनी साकारलेल्या शाडू मातीच्या गणपती मूर्त्या यंदा नाशिकरोडच्या गणेशोत्सवाचा उत्साह वाढवत आहेत. मध्यवर्ती कारागृह हे तसे बंदीजनांसाठीचे शिक्षेसाठी तुरुंग असले तरीही येथील ’कारखाने’ हे या बंदीजनांची एक वेगळी ओळख निर्माण करून देत आहेत. यासोबतच त्यांच्यातील कलेलाही जिवंत ठेवून यापुढील काळात रोजगाराचा पर्यायही उपलब्ध करून देत आहेत.

यावर्षीच्या गणेशोत्सवात शाडू मातीचे गणपती नाशिकरोडकरांना उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास 15 बंदीजन वर्षभरापासून कारागृह उपअधीक्षक सचिन चिकणे व वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशोक मलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. या बंदीजनांनी बनवलेल्या १६ प्रकारच्या गणपतींच्या एकूण ७०० मूर्ती येथील कारागृहाबाहेरील दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. कारागृहातील बंदीजनांकडून बनवल्या गेलेल्या चामडे, लाकडी फर्निचर, लोखंडी वस्तू कापडे, चादरी इ. विविध वस्तू येथे वर्षभर विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र, यंदा नियोजनपूर्वक पद्धतीने कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांच्या संकल्पनेनुसार वर्षभरात गणपतीच्या मूर्ती बंदीजनांकडून तयार करून घेण्यात येऊन त्या येथे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी येथे असलेल्या विविध प्रकारच्या विक्रीच्या वस्तू तूर्तास काढून केवळ गणपतीच्याच मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

- Advertisement -

येथून मूर्ती घेतल्यास लाकडी पाट आणि लाल कपडा मूर्तीबरोबर मोफत देण्यात येतो. या गणपती मूर्ती अत्यंत सुबक पद्धतीने बनवण्यात आलेल्या असून, गणपतीसाठी वापरण्यात आलेल्या पितांबराचा रंग हा ’वेलवेट पेंट’ वापरण्यात आलेला आहे. या मूर्ती पर्यावरणपूरक असून, एक तासाच्या आत त्या पाण्यात विरघळतील अशा पद्धतीनेच बनवण्यात आली असल्या असून मूर्तींची किंमतही वाजवी स्वरूपात म्हणजेच आठशे रुपयांपासून ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती येथील कर्मचार्‍यांकडून देण्यात आली. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात येथे दररोज भेट असून या गणेशमूर्तींना महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने बंदीजनांच्या कलेलाही वाव मिळाला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -