घरमहाराष्ट्रनाशिकमालेगावी अंदाजपत्रकीय महासभेत गोंधळ; राजदंड पळवण्याचा प्रयत्न

मालेगावी अंदाजपत्रकीय महासभेत गोंधळ; राजदंड पळवण्याचा प्रयत्न

Subscribe

महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांनी पाच टक्के पाणीपट्टी वाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी, २ मार्चला झालेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत महापौर शेख रशीद यांच्यासमोर मोठा गोंधळ घातला. या सभेत विरोधकांनी थेट राजदंड पळविण्याचाही प्रयत्न केला.

महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांनी पाच टक्के पाणीपट्टी वाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी, २ मार्चला झालेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत महापौर शेख रशीद यांच्यासमोर मोठा गोंधळ घातला. या सभेत विरोधकांनी थेट राजदंड पळविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी नगरसेवकांनी तो हाणून पाडला. अशा गोंधळाच्या वातावरणातही स्थायी समिती सभापती जयप्रकाश पाटील यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाला महापौरांनी मान्यता दिली.

महापालिका प्रशासनाने २०१९- २० या आर्थिक वर्षासाठी एकूण ३४९ कोटी ३४ लाखांचे अंदाजपत्रक सोमवारी स्थायी समितीला सादर केले. स्थायी समितीने तीन बैठका घेत या अंदाजपत्रकात जवळपास १५ कोटी ४४ लाखांची वाढ करत ३६४ कोटी ७८ लाखांचे अंतिम अंदाजपत्रक सादर केले. तत्पूर्वी गठबंधन आघाडीच्या नगरसेवकांनी पाणी़पट्टीत केलेली ५ टक्के वाढ रद्द करण्याची मागणी करत एकच गोंधळ घातला. यावेळी जनता दलाचे नगरसेवक अय्याज अहमद यांनी चक्क महापौरांसमोरील जागेत झोपून निषेध व्यक्त केला. तर, महिला नगरसेवकांनी प्लास्टिकचे हंडे वाजवून पाणीपट्टी वाढ रद्द करा, अशा घोषणा दिल्या. या गोंधळात स्थायी समिती सभापती पाटील यांनी अंदाजपत्रक महासभेत सादर केले व महापौरांनी त्याला मान्यता दिली. यावेळी सत्ताधारी नगरसेवकांसह एमआयएम व भाजपच्या नगरसेवकांनी याचे स्वागत केले. या गोंधळात विरोधकांनी संधी साधत महापौरांपुढील राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी नगरसेवकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी विरोधकांनी थेट महापौर दालनात शिरकाव करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याने सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. या गोंधळात ३६४ कोटी ७८ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांनी राष्ट्रगीताला सुरवात केल्याने सभा आटोपली. अवघ्या १० ते १५ मिनिट चाललेल्या या सभेनंतर महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषद घेत गोंधळाचा निषेध नोंदविला.

- Advertisement -

फेरफार व सुधारणेचा सर्वस्वी अधिकार मला

चर्चा करून महासभेने निर्णय घेतला असता. मात्र, विरोधकांनी निव्वळ राजकारण करत अंदाजपत्रकीय महासभेत गोंधळ घातला. विरोधकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. मात्र, या गोंधळातदेखील अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले असून, यात फेरफार व सुधारणेचा सर्वस्वी अधिकार महासभेने मला दिले आहेत. – रशीद शेख, महापौर, मालेगाव महानगरपालिका

राजकारण करत शक्तीप्रदर्शन

स्थायी समितीने अंदाज पत्रकावर चर्चा करण्यासाठी तीन बैठकांचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीत गटबंधन आघाडीच्या नगरसेवकांनी कुठलीही सूचना मांडली नाही. महासभेत गोंधळ घालून निव्वळ राजकारण करून आपले शक्ती प्रदर्शन दाखवायच्या प्रयत्न विरोधकांनी केला. ही शरमेची बाब असून याचा आम्ही निषेध करतो. – जयप्रकाश पाटील, सभापती, स्थायी समिती, महापालिका

- Advertisement -

गोंधळाची बाब निंदनीय

शहरहितासाठी नागरिकांनी आम्हाला महापालिकेत पाठवले आहे. या अंदाजपत्रकीय महासभेत शहरहिताच्या दृष्टीने काही सुचना करायच्या होत्या. मात्र, गठबंधन आघाडीच्या नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळामुळे सूचना मांडता आल्या नाही. ही बाब निंदनीय असून असमर्थनीय आहे. भाजप गटनेता म्हणून याचा निषेध व्यक्त करतो. – सुनील गायकवाड, गटनेते, भाजप

महिला नगरसेवकांनादेखील धक्काबुक्की

तत्कालिन महापौर आसिफ शेख यांच्या कार्यकाळापासून सुरू असलेली ५ टक्के पाणीपट्टी वाढ रद्द करावी, अशी मागणी महागठबंधन आघाडीने केली होती. मात्र, यास स्थायी समितीने दाद दिली नाही. महापौर दडपशाहीचा अवलंब करतात. पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी, अशी मागणी करत असताना महिला नगरसेवकांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. याचा आम्ही निषेध करतो. – शान ए-हिंद, नगरसेविका, महागटबंधन आघाडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -