घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमधील मॉल, मंगल कार्यालयांसह गर्दीची ठिकाणे महानगरपालिकेच्या रडारवर

नाशिकमधील मॉल, मंगल कार्यालयांसह गर्दीची ठिकाणे महानगरपालिकेच्या रडारवर

Subscribe

सिडको विभागात कारवाईचा धडाका; दीड लाखांचा दंड वसूल

नाशिक : येथील एका मंगल कार्यालयात प्रमाणापेक्षा अधिक गर्दी व कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच पालिका आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे यांच्या पथकाने छापा टाकत कारवाईचा बडगा उचलला. अचानक पडलेल्या छाप्यामुळे वर्‍हाडींची मास्क लावण्यासाठी एकच धावपळ उडाली.

ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी, गर्दीवर, तसेच लग्न व इतर समारंभांवर निर्बंध लागू केले आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या नवीन नाशिक विभागाकडून नवीन नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक कारवाई सुरू करण्यात आली असून, विभागीय अधिकारी मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे यांच्या पथकाने मॉल, गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालये व दुकानांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे.

- Advertisement -

या मोहिमेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत नियम मोडणार्‍या आस्थापनांकडून तब्बल १ लाख ३६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत कोरोना नियमांचे पालन न करता क्षमतेपेक्षा जास्त लोकांची गर्दी असल्याने डी. मार्ट शॉपिंग मॉलविरुद्ध ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर, मंगल कार्यालयात सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात निर्देशांपेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याने एकूण ३ मंगल कार्यालयांवर प्रत्येकी २५,००० प्रमाणे एकूण ७५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल १२ प्रकरणांमध्ये एकूण ६ हजार, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करण्यासाठी १ केस ५ हजार असे एकूण १७ प्रकरणांमध्ये तब्बल १ लाख ३६ हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक बी. आर. बागूल, रावसाहेब मते, जितेंद्र परमार, सुशील परमार, संतोष गायकवाड तसेच स्वच्छता मुकादम दीपक लांडगे, अशोक दोंदे, बिरजू गोगलिया, संतोष बागूल, अविनाश गांगुर्डे, राजाराम गायकर व वाहन चालक सुनील पाटील आदी सहभागी झाले होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -