घरमहाराष्ट्रनाशिकगोदावरीच्या महापुराने वाढवली पूररेषेची सीमा

गोदावरीच्या महापुराने वाढवली पूररेषेची सीमा

Subscribe

नवा वाद उद्भवणार; जलसंपदा विभाग करणार तपासणी

गोदावरीला रविवारी (ता. ४) आलेल्या महापुराने आजवरचे सर्वच विक्रम मोडल्याने पुराचे पाणी थेट तिवंधा चौकापर्यंत येऊन ठेपले होते. परिणामी पूररेषेची सीमाही आता वाढण्याची शक्यता असून त्यादृष्टीने जलसंपदा विभाग आता पुराची यंदाची सीमारेषा कुठपर्यंत होती याची पाहणी करण्याच्या तयारीत आहे. परिणामी आधीच्या पूररेषेने धास्तावलेल्या नदीकाठच्या रहिवाशांना आता या नव्या संकटाने अधिक घाम फोडला आहे.

सप्टेंबर २००८ मध्ये यापूर्वी महापूर आला होता. त्यामुळे नाशिक जलमय झाले होते. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने गोदावरी, नासर्डी, वालदेवी, कपिला या नद्यांच्या पूररेषा तयार केल्या होत्या. या पूररेषेत शहरातील जवळपास ३५०० इमारती आल्या होत्या. संबंधीत बांधकाम व्यावसायिकांनी थेट नदीपात्रातच इमारती उभ्या केल्याने महापुराचा धोका वाढला असल्याचा निष्कर्ष या पूररेषेत काढण्यात आला होता. गोदावरीपात्रात १९८० इमारती निळ्या रेषेत होत्या, तर एक हजार इमारती लाल पूररेषेत होत्या; परंतु महासभेने ही पूररेषा फेटाळून लावली होती. मात्र, राजेश पंडित आणि निशिकांत भालेराव यांनी गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने लाल आणि निळी पूररेषा आखून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते. २००८ चा पूर निसर्गनिर्मित नसून तो मानवनिर्मित होता. धरणातील पाणीसाठा वाढल्याने संबंधित कर्मचार्‍यांनी पॅनिक बटण दाबल्याने धरणातून अधिक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे हा पूर म्हणून गृहीत धरू नये असाही युक्तीवाद महापालिका प्रशासनाकडून केला जात होता. या सर्व चर्वितचर्वणात ११ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, या काळात परिसरातील रहिवाशांवर पूररेषेची टांगती तलवार कायम आहे. आता नदीची पूरपातळीत अधिक वाढ झाली. आजवर सरकारवाड्याच्या सात पायर्‍यांपर्यंत कधीही पाणी आले नव्हते.

- Advertisement -

यंदा मात्र सात पायर्‍यांच्या वर पाणी पोहोचले. तसेच सोमवार पेठ, तिवंधा चौकापर्यंतही कधीही पाणी आले नव्हते. या चौकांच्या अलीकडे पाणी थांबले होते. पण रविवारच्या पुराचे पाणी तेथेपर्यंत आल्याने ही नवी पूररेषा निश्चित होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पाहणी करण्याची तयारीही केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नव्या पूररेषेनुसार कार्यवाही करावी

गोदावरी आणि तिच्या उपनद्यांनी आता त्यांची नवी पूररेषा निश्चित केली आहे. प्रशासनाला २००८ च्या पूराविषयी शंका होती, म्हणून पुढील कार्यवाही लांबवण्यात येत होती. रविवारचा पूर तर मानवनिर्मित नव्हता. त्यामुळे आता या नव्या पूररेषेनुसार कार्यवाही करावी, अशी मागणी मी विभागीय आयुक्तांकडे करीत आहे. पूररेषा नदीसाठी नाही तर मानव आणि वित्त हानी टाळण्यासाठी आहे हे लक्षात घ्यावे. – राजेश पंडित, याचिकाकर्ते

- Advertisement -

तर सामना आमच्याशी

४०० वर्षांपासून जुने नाशिक आणि गोदा काठची मंदिरे आहेत. पूररेषेच्या नावाने कुणी या वास्तुंना पाडण्याचा विचार जरी करीत असेल, तर आमच्याशी सामना करावा लागेल. यापूर्वी तीन विकास आराखडे तयार झाले. त्यानुसार इमारतींना परवानग्या देण्यात आल्यात. त्यामुळे आता प्रशासन कोणत्या आधारे या दिलेल्या परवानग्या नाकारणार? पूररेषेतून गावठाणाला वगळावे लागेल. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. – शाहू खैरे, गटनेता, काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -