घरमहाराष्ट्रनाशिकगणेशोत्सव मंडळांना मिळणार ‘एक खिडकी’ परवानगी, पोलिसांकडून ऑनलाईन सुविधा

गणेशोत्सव मंडळांना मिळणार ‘एक खिडकी’ परवानगी, पोलिसांकडून ऑनलाईन सुविधा

Subscribe

नाशिक : अवघ्या १८ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने नाशिक महापालिकेपाठोपाठ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे सार्वजनिक गणेश मंडळांना अटी व शर्तींच्या आधीन राहून ऑनलाईन परवानगी दिली जाणार आहे. पोलीस आयुक्तालयात ई स्वरुपात एक खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. यामुळे गणेश मंडळाची धावपळ थांबणार असून, दिलासा मिळणार आहे.

येत्या १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे वाजतगाजत आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासाठी गणेश मंडळांना अनेक परवानग्या महापालिका व पोलीस आयुक्तालयाकडून घ्याव्या लागतात. सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नुकतीच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेत चर्चा केली असून, काही मागण्या केल्या आहेत. राज्य सरकारने गणेश मंडळांसाठी नियमावली शिथिल करण्यासह इतर निर्णयांची तयारी केली आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांत मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाणार आहेत.

- Advertisement -

गणेश मंडळांना अनेक परवानग्यांसाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाकडे जावे लागते. महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली आहे. परंतु, पोलीस आयुक्तालयात आत्तापर्यंत असे काही योजना नाही. त्यामुळे मंडळांनी पोलीस ठाण्यात अर्ज केल्यानंतर, त्यानंतर सहायक आयुक्त, उपायुक्त आणि अखेरीस आयुक्तालयातून परवानगी दिली जाते. यंदा पोलीस आयुक्तालयाकडूनही ई-स्वरूपाची एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. गणेश मंडळांना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

पोलीस आयुक्तालयातर्फे गुरुवारपासून सार्वजनिक गणेश मंडळांना ई खिडकी सुविधा सुरु केली आहे. ऑनलाईन अर्जानंतर अर्जाची पडताळणी करून गणेश मंडळांना परवानगी दिली जाणार आहे. : अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक

गतवर्षी जिल्ह्यात ९०७ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे सहा वर्षांपासून एक गाव एक गणपती या संकल्पनेंतर्गत प्रबोधन केले जात आहे. जिल्ह्यात २०१९ मध्ये १३०० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झाली. त्या वर्षी सुमारे एक हजार गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली होती. गतवर्षी २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे जिल्ह्यात निर्बंध असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव झाले नाहीत. २०२२ मध्ये जिल्ह्यात ९०७ हून अधिक गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यात आली. यंदासुद्धा ग्रामीण पोलिसांकडून एक गाव गणपती संकल्पना राबविली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -