केंद्र सरकार अधिकारी,कर्मचार्‍यांसाठी आरोग्य सेवा

नाशकात साकारणार वेलनेस सेंटर

ESIC-647
केंद्र सरकार अधिकारी,कर्मचार्‍यांसाठी आरोग्य सेवा

जिल्ह्यातील केंद्र शासनाचे अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य सुविधांसाठी शहरात आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सेंन्ट्रल गर्व्हनमेंट हेल्थ स्किम (सी.जी.एच.एस) सुविधा व कल्याण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रामुळे या कर्मचार्‍यांना कॅशलेस उपचार सुविधा मिळणार आहे.

जिल्ह्यात केंद्र सरकारचे अधिकारी, कर्मचारी, पेन्शनधारकांची संख्या मोठी आहे; परंतु केंद्राच्या सेंन्ट्रल गर्व्हनमेंट हेल्थ स्किममध्ये नाशिकचा समावेश नसल्याने कर्मचार्‍यांना आरोग्यसेवा उपलब्ध होत नव्हत्या. याकरता आर्टिलरी स्टॅटिक वर्कशॉप सिव्हिल अ‍ॅण्ड एम्प्लॉइज युनियनच्या पदाधिकार्‍यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे या केंद्रासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. गोडसे यांनी याकरता ‘सी.जी.एच.एस’च्या मुंबई, पुणे कार्यालयाकडे तसेच तत्कालीन आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर आकडेवारीच्या निकषात हे केंद्र असल्याचे लक्षात आल्यानंतर हे केंद्र कार्यान्वित करण्याचे आश्वासन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने पत्राद्वारे दिले आहे. या केंद्रासाठी आर्टिलरी स्टॅटिक वर्कशॉप सिव्हिल अ‍ॅण्ड एम्प्लॉइज युनियनचे मनोज बागूल, यू.एन.वाघमारे, किरण मराठे, एम.के.शेख यांनी गोडसे यांच्याकडे पाठपुरावा करत सर्व कर्मचार्‍यांची माहिती संकलित केली. त्यानुसार जिल्ह्यात ७० हजार अधिकारी, कर्मचारी व पेन्शनधारक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या सर्वांना उपचारासाठी या केंद्राचा फायदा होणार आहे.

यांना मिळणार लाभ

या केंद्राचा लाभ नाशिककरोड येथील करन्सी नोट प्रेस, रेल्वे, टपाल, एअर फोर्स, गांधीनगर प्रेस, आयकर विभाग आदी केंद्र शासनाच्या विभागातील अधिकारी, कर्मचारी, तसेच पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना होणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या आजारांवर कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.