घरमहाराष्ट्रनाशिकत्रिमूर्ती चौकात वाहनचालकांची बेशिस्ती; पोलिसांकडून डोळेझाक?

त्रिमूर्ती चौकात वाहनचालकांची बेशिस्ती; पोलिसांकडून डोळेझाक?

Subscribe

संजय खैरनार । नवीन नाशिक

ठिकठिकाणी अतिक्रमणांचा बाजार, भररस्त्यात पार्क केलेली वाहने आणि बेशिस्त वाहनचालकांचा त्रास यामुळे त्रिमूर्ती चौक परिसर सातत्याने कोंडीत सापडलेला असतो. सिग्नलचे मोडणार्‍यांची संख्या अधिक असल्याने लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. असे असतानाही महापालिका व पोलीस यंत्रणेचे याकडे लक्ष्य नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

- Advertisement -

त्रिमूर्ती चौक परिसरात वाहतूक कोंडी ही नेहमीचीच समस्या बनली आहे. या परिस्थितीला वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे. त्रिमूर्ती चौकातील सिग्नल सुटल्यानंतर वाहनधारक सुसाट निघतात. त्यातच पाटीलनगर कॉर्नर चौफुलीवर सिग्नल तर नाहीच परंतु, वाहतूक पोलीसही तैनात नसल्याने वाहनधारकांना कुणाचाच धाक राहिलेला नाही. चार रस्ते एकत्र येत असल्याने येथे दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असते. याठिकाणी असलेल्या दुकानासांसमोरच ग्राहक आपली वाहने पार्किंग करतात. वाहने पार्किंगनंतर मात्र वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. ही वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने वाहनधारकांवर कोणाचाच वचक राहिलेला दिसत नाही. या चौफुलीलगत असलेल्या दुकानांसमोरील मोकळ्या जागेत अनेक चारचाकी वाहने सर्रासपणे पार्किंग केलेली असतात. त्यामुळे तर पायी चालणेदेखील कठीण झाले आहे.

या चौफुलीवर अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने ग्राहकांची मोठी गर्दी होते. ग्राहक दुकानांसमोरच आपली वाहने पार्क करून गायब होतात. नेमक्या याचवेळी वाहतूक कोंडी होते. परंतु, या वाहतूक कोंडीच्या नियमनासाठी वाहतूक पोलीस तैनात नसल्याने वाहतूक नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निदान आतातरी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी लक्ष्य देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

- Advertisement -

पाटीलनगर चौफुलीवर अपघातांची मालिका

त्रिमूर्ती चौकानंतर पाटीलनगर चौफुली सर्वात वर्दळीचा भाग बनली आहे. येथे रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची मोठी संख्या आहे. या चौफुली परिसरातील अतुल डेअरी दुकानासमोर सकाळ-सायंकाळ ग्राहकांची मोठी गर्दी असते. या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच पार्क होत असल्याने येथून जाणार्‍या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. दुसरीकडे पादचार्‍यांचे मोठे हाल होतात. या दुकानासमोर यापूर्वीही अनेक अपघात झालेले आहेत. काही वर्षांपूर्वी दोन विद्यार्थ्यांना अवजड वाहनाने चिरडले होते. त्यानंतरही येथील वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. पोलीस प्रशासन मात्र या सर्वच गोष्टींकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करतेय की काय, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -