घरमहाराष्ट्रनाशिकजायकवाडी @ 95 % ,नाशिक-मराठवाडा जलतंटा टळला

जायकवाडी @ 95 % ,नाशिक-मराठवाडा जलतंटा टळला

Subscribe

नाशिक आणि नगरकरांना पिण्यासह, शेती आणि सिंचनालाही मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा

आशिया खंडातील सर्वात मोठे धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण यंदा तब्बल ९५ टक्के भरले आहे. यामुळे धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटला आहे. तर मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार यंदा नाशिक-नगर अर्थात उत्तर महाराष्ट्रातील कुठल्याही धरणांतून मराठवाड्यास पाणी सोडण्याची अजिबात आवश्यकता नाही. पुढील संपूर्ण वर्षभर नाशिक आणि नगरकरांना पिण्यासह, शेती आणि सिंचनालाही मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पैठण येथील १०३ टीएमसी क्षमतेचे जायकवाडी धरण (नाथसागर) यंदा ९५ टक्के भरले आहे. जायकवाडी धरणावर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे पाच जिल्हे थेट अवलंबून आहेत. तर परळी इथल्या वीजनिर्मिती थर्मलसुध्दा याच पाण्याचा अवलंबून आहे. चारशे गावांची तहान हे धरण भागवत असते. दरवर्षी अपुर्‍या पावसामुळे नाशिक, नगर जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाण्याचा विसर्ग करावा लागतो. यातून वाद निर्माण होतात. परंतू महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (एमडब्ल्यूआरआरए) आदेशाने मेंढेगिरी समितीच्या अहवालातील तक्ता नं. ६ मधील स्टॅटेर्जी-३ नुसार आता नाशिक-नगर अर्थात उत्तर महाराष्ट्रातील कुठल्याही धरणांतून मराठवाड्यास पाणी सोडण्याची अजिबात आवश्यकता नाही. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू झाल्याने गंगापूर आणि दारणासमूहात मुबलक पाणी उपलब्ध झाले.

- Advertisement -

गंगापूर, दारणा धरण १०० टक्के भरले. पावसाची संततधार बघता धरणांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी ठेवणे अशक्य असल्याने दारणासह नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, जायकवाडीच्या पाणलोटमध्येही चांगला पाऊस झाला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणूनच आजच्या स्थितीत जायकवाडी धरणात ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी नाशिक-नगर-मराठवाडा हा पाणी वाद पुन्हा निर्माण होणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कशामुळे यंदा सोडावे लागणार नाही पाणी?

औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने शासनाने मेंढेगिरी समितीतील अभ्यास गटाने १९ सप्टेंबर २०१४ रोजी अहवाल सादर केला. त्यानुसार १५ ऑक्टोबरनुसार धरणात किती पाणी उपलब्ध असावे, अशी साठ्यांची निश्चिती केली. त्याचे ‘समन्यायी पाणी वाटप कायदा’ असे नामकरण केले. या कायद्यानुसार जायकवाडीच्या बाबतीत तक्ता नं. ६ व त्यातील स्ट्रॅटर्जी-३ नुसार जायकवाडीत १५ ऑक्टोबरला खरिपातील वापरासह ६५ टक्के पाणी उपलब्ध असल्यास ऊर्ध्व गोदावरीतील धरणातून पाणी सोडण्याची गरज नाही. त्यानुसारच गंगापूरमध्ये ८२ टक्के, दारणात १०२ तर पालखेडमध्ये ८२ टक्के पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यंदाचा जायकवाडीतील साठा ९५ टक्क्यांपुढे गेला आहे. त्यामुळे नगरसह नाशिकमधील धरणांतून पाणी सोडावे लागणार नाही.

- Advertisement -

जायकवाडीसाठी या धरणांतून पाणी

दारणा धरण समूह, गंगापूर धरण समूह, पालखेड समूहातील पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून गोदावरी नदीमार्गे जाते. हे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून जाते. कादवा, दारणा या दोन्ही नद्यांचे पाणी गोदावरीला मिळून पुढे ते जायकवाडीकडे जाते. अहमदनगरमधील भंडारदरा धरणातील पाणी निळवंडे, ओझर बंधार्‍यातून प्रवरा नदीतून जायकवाडी धरणात पोहोचते. अहमदनगरमधील मुळा नदी ही थेट जायकवाडी धरणात जाऊन मिळते.

जायकवाडीचे १८ दरवाजे उघडले

जायकवाडी धरणात सध्या वरील भागातून सुमारे १ लाख ५ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात ९ हजार ७३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे .धरणाचे आठरा दरवाजे अर्धा फुट उघडण्यात आले आहे. जायकवाडी विभागाच्या प्रशासनाने गोदावरी काठच्या अहमदनगर , औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, भागातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे हे धरण दुसर्‍या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने लाभक्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -