घरमहाराष्ट्रनाशिकमहानगर विशेष : 'एन्ट्री-फी'च्या नावाने बाजार समितीत वाहनचालकांची सर्रास लूट?

महानगर विशेष : ‘एन्ट्री-फी’च्या नावाने बाजार समितीत वाहनचालकांची सर्रास लूट?

Subscribe

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘एन्ट्री फी’ च्या नावाखाली वाहतुकदारांची सर्रास लुट केली जात आहे. विशेषत: पररराज्यातून आलेल्या वाहन धारकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जात आसल्याच्या तक्रारी आहेत. या वसुलीसाठी बाजार समितीच्या कारभार्‍यांच्या मर्जीतल्या कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांना महिन्याचे टार्गेट ठरवून दिलेले आहे. त्यांच्याकडून मुख्य बाजार समितीतून तीन लाख रुपये आणि शरदचंद्र पवार मार्केटमधून १ लाख रुपये महिन्याला घेतला जात असल्याची चर्चा आहे. टार्गेट पार करण्यासाठी या कर्मचार्‍यांकडून वाहन धारकांवर दादागिरी केली जात असून वसुलीसाठी हानामार्‍या देखील होत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसरात्र लहानमोठ्या वाहनांची ये-जा सुरु असते. त्यामुळे एन्ट्रीच्या माध्यमातून देखील बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर लुटमार होत असल्याचे दिसून येत आहे. छोट्या व्यापार्‍यांपासून ते मोठ्या व्यापार्‍यांकडे शेतीमाल घेवून जाण्यासाठी छोटीमोठी वाहने येतात. बाजार समितीत प्रवेश करण्यासाठी या वाहनांकडून एन्ट्री फी घेतली जाते. या एन्ट्री फी साठी खास ठेकेदार नेमले असून बाजार समितीच्या काही कर्मचार्‍यांनी दुसर्‍यांच्या नावावर वसूलीचा ठेका घेतल्याची चर्चा आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी या ठेकेदारांकडून वाहचालकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. पाच रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत एन्ट्री फी घेतली जात असून परराज्यातून येणार्‍या मोठ्या वाहन धारकांकडून मात्र तासांवर पैसे घेतले जातात, असे येथील एका वसूली कर्मचार्‍याने सांगितले.

- Advertisement -

कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसभारात 500 ते 1000 वाहने येत असतात. त्यांची एन्ट्री फी वेगळी असते तर शेती माल भरुन जाताना वेगळे पैसे द्यावे लागतात. शेती माल भरुन जाणार्‍या वाहनांकडून सरासरी 25 ते 30 रुपये घेतले जातात तर मोठ्या वाहनांकडून 200 ते 500 रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात. परराज्यातील वाहन चालकांकडून मात्र मोठी रक्कम घेतली जाते. परराज्यातील वाहन चालकांना पैशांसाठी दमदाटी होत असल्याच्या तक्रारी असून पैसे न दिल्यास या वाहन चालकांना मारहानही होत असल्याचे बोलले जाते. शरदचंद्र मार्केटमध्ये मात्र काहीशी परिस्थिती वेगळी असून येथे प्रवेश द्वारावर वसूली न करता व्यापार्‍यांच्या गाळ्यात जाऊन वाहन चालकांकडून पैसे घेतले जातात. बाजार समितीतील दोन्ही मार्केटमधून वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. मुख्य बाजार समितीतुन 3 लाख रुपये तर शरदचंद्र मार्केटमधून १ लाख रुपये प्रति महिना ठरवुन दिला असल्याने हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी मनमानी पद्धतीने वसूली केली जात असल्याचे बोलले जाते. वसूलीची काही ‘माया’ बाजार समितीत जमा होतो तर काही ‘माया’ सत्ताधार्‍यांकडे जात असल्याची चर्चा आहे.

रोजची वसूली घटली 

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवाजी चुंभळे हे सभापती असताना होणारी वसुली 25 ते 30 हजारांच्या घरात होती. सायंकाळच्या वेळी सुद्धा 10 ते 15 हजार रुपये वसूल होवून बाजार समितीच्या तिजोरीत त्याचा भरणा होत होता. मात्र अलीकडच्या काळात ही वसुली 10-15 हजार रुपयांवर आली असल्याने या वसूलीमधील संशय वाढला आहे. इतकी मोठी वसुली होत असताना वसुलीत तुट झाल्याने हा वरचा पैसा कुणाच्या खिशात जात आहे याबाबत उलट सुलट चर्चा केली जात आहे. बाजार समितीमध्ये सध्या भगवान दातीर, गणेश इंगळे, एस. टी. शिंदे, धनाजी राजोळे हे वसुली विभागाचे कामकाज पहातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -