घरमहाराष्ट्रनाशिकशहरात गोवर लसीकरणास सुरूवात, पहिल्याच दिवशी २७५ बालकांचे लसीकरण

शहरात गोवर लसीकरणास सुरूवात, पहिल्याच दिवशी २७५ बालकांचे लसीकरण

Subscribe

नाशिक : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून गोवर प्रतिबंधक विशेष लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली असून १५ ते २५ डिसेंबर या काळात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहीमेच्या पहिल्या दिवशी १२ ठिकाणी विशेष वंचित लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले होते. या सत्रात २७५ बालकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य सेविकांच्या मार्फत १३६ बालकांना एमआर १ चा डोस तर एमआर २ चा डोस १३९ बालकांना देण्यात आला.

मोहीमेंतर्गत सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांच्या वैद्यकीय पथकाने औरंगाबाद नाका, पंचवटी येथे भेट दिली. या परिसरात काही स्थलांतरीत नागरिक राहतात. तेथील पालक बालकांना डोस घेण्यास तयार नव्हते. यावेळी नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले. समुपदेशन केल्यानंतर नागरिक बालकांचे लसीकरण करण्यास तयार झाले. यावेळी आशा सेविकेने बालकांना एक ठिकाणी बोलावून १७ वंचित बालकांना एमआर १ चा पहिला डोस देण्यात आला. वैद्यकीय पथकात युनिसेफ सल्लागार डॉ. सुमेध कुदळे, युनिसेफ क्षेत्र समन्वयक नलिनी चास्कर, तपोवन युपीएचसी वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका पाटील, पीएचएन सुनीता गांगुर्डे, एएनएम मनीषा खोलासे, आशा सेविका चित्रा पवार यांचा सहभाग होता. नाशिक शहरातील पालकांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, सर्व्हेक्षणाला येणार्‍या कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

- Advertisement -
दोन टप्प्यांमध्ये राबविणार मोहीम

दरम्यान पहिल्या टप्यात १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर आणि दुसर्‍या टप्प्यात १५ जानेवारी २०२३ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत गोवर रुबेला लसीकरण होणार आहे. नाशिक शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत महापालिका क्षेत्रात आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. ९ महिने ते ५ वर्षे वयाच्या बालकांचा गोवर रुबेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस अथवा दोन्ही डोस राहिलेल्या बालकांची यादी तयार करण्यात आली आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवस असेल याची खबरदारी घेण्याची सूचना शासनाच्या आरोग्य विभागाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -