घरमहाराष्ट्रनाशिकमुंढेगाव 'फिल्मसिटी' प्रस्तावाच्या फाईलवरील धूळ झटकली जाणार?; १२ वर्षापासून प्रलंबित

मुंढेगाव ‘फिल्मसिटी’ प्रस्तावाच्या फाईलवरील धूळ झटकली जाणार?; १२ वर्षापासून प्रलंबित

Subscribe

नाशिक : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी असलेल्या नाशिक जिल्ह्यात मुंढेगाव येथे चित्रनगरी साकारण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने १२ वर्षांपूर्वी दिलेला प्रस्ताव आजही मंत्रालयात धुळखात पडून आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करत जागेची मागणी केली आहे.

दादासाहेब फाळके यांच्या नावाने हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. आशिया खंडातील पहिला चित्रपट निर्माण करुन दादासाहेबांनी भारतीय चित्रपटसृष्टीची निर्मिती केली. जन्मभूमीत त्यांचे स्मारक उभे राहीले मात्र नाशिकमध्ये फाळके चित्रपटनगरी उभी राहावी अशी कलावंतांची इच्छा आहे. इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव शिवारात महामार्गालगत असणारी गायरान जमीन शासनाने विविध प्रयोजनासाठी वापरली असताना, आता शिल्लक असलेल्या ४०० एकर जागेवर चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी उभारण्याचे चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या विचारधीन आहे. त्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. या चित्रनगरीसाठी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये अलिकडच्या काळात विविध मालिका आणि चित्रपटांचे शुटींग होऊ लागले आहेत. यापुर्वी नाशिकमध्ये प्रतिघात, नरसिंहा, लुटालुट, खाकी, तेरे नाम, सावरखेड एक गाव या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण नाशिकमध्येच झाले. प्रतिबिंब, स्वामी हे चित्रपट नाशकात झाले. त्यानंतरही बुलेट राजा, पीके यासारख्या बिग बजेट चित्रपटाचे चित्रीकरणही नाशकात झाले. त्यामुळे नाशिकमध्ये चित्रपटनगरी असावी अशी कलावंतांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रस्तावाची फाईल धुळखात पडून आहे मात्र आता पालकमंत्री दादा भुसे यांनी पुन्हा या विषयाबाबत पाठपुरावा सुरू केला असून या जागेबाबत मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी महसुल विभागास त्रृटी पुर्ततेसह सादर केला असून लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी भुसे प्रयत्नशील आहेत. याकरीता त्यांनी आता महसूलमंत्री विखे पाटील यांनाही पत्रव्यवहार केला आहे.

का रखडले ?

नाशिकमध्ये साधारण बारा वर्षांपुर्वी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत उत्तर महाराष्ट्र पॅकेज अंतर्गत नाशिकसाठी दोन हजार कोटी रूपयांचा निधी देण्याचा विचार झाला. अर्थात पुढे हा निधी काही मिळालाच नाही. यामध्ये कुसुमाग्रज स्मारक, फाळके चित्रपटसृष्टी असे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले होते. पॅकेजमधून दहा कोटी रुपये दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी निर्माण करण्यासाठी दिले होते. इगतपुरी येथे जागेचा शोध सुरू होता; मात्र मुंबई व नाशिकच्या मध्यभागी असल्यामुळे इगतपुरीतील जागेचे भाव आवाक्याबाहेर गेले आहे. दहा कोटी रुपयांत केवळ जागाच खरेदी होईल. नुसती जागा घेऊन काय उपयोग, असा प्रश्न असल्यामुळे चित्रपटसृष्टीचा प्रस्ताव सध्या पडून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -