घरमहाराष्ट्रनाशिकटीईटी घोटाळ्यात आता नाशिकचंही नाव

टीईटी घोटाळ्यात आता नाशिकचंही नाव

Subscribe

पैसे परत मागण्यासाठी परीक्षार्थींकडून हस्तकांकडे तगादा सुरू

नाशिक : टीईटी परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर नाशिक विभागातील नाशिकसह मालेगाव, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर येथील दलालांमध्ये खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर ज्या उमेदवारांनी त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी पैसे देवून ठेवले आहेत, तेच उमेदवार आता पैसे परत मागण्यासाठी त्यांच्याकडे तगादा लावत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर यांना अटक केली. त्यांच्याकडून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून त्यांनी याप्रकरणी पैसे घेतल्याची कबुलीही दिल्याचेही समजते. याशिवाय त्यांच्या घरात टीईटीचे ओळखपत्रही सापडले आहेत. या सर्व घोटाळ्यात एकटे अधिकारी सहभागी नसून प्रत्येक जिल्ह्यात, गावात त्यांचे दलाल कार्यरत आहेत. या दलालांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करुन देण्यासाठी उमेदवारांकडून एक ते तीन लाख रुपये घेतल्याची माहिती आहे.

- Advertisement -

मात्र, मुख्य सूत्रधाराच्याच मुसक्या आवळल्याने दलालांसह संबंधीत उमेदवारांचेही धाबे दणाणले आहे. काही दलाल शहर, जिल्हा सोडून पसार झाले आहेत. काहीनी फोन बंद करून ठेवले आहेत. त्यामुळे आता या उमेदवारांना त्यांचे पैसे परत मिळतील की नाही? संबंधीत उमेदवार टीईटी उत्तीर्ण होतील काय? की टीईटी परीक्षाच रद्द होईल? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, उमेदवार दलालांकडून पैसे मागत असल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहे. त्यामुळे आता संबंधीत विभागाने या संपूर्ण घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्वच घटकांची साखळी शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सुपे अन् नाशिकचे कनेक्शन

काही वर्षांपूर्वी तुकाराम सुपे हे नाशिक येथे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांच्याकडे नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांचे कामकाज होते. त्यामुळे नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगांव जिल्ह्यातील बर्‍याच शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक संघटनांशी त्यांचा नियमित संपर्क होता. तेव्हापासून जिल्ह्यातील काही जण त्यांच्या ‘मर्जीतील’ बनले आहेत. त्यामुळे सुपे हे पुणे येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर या दलालांचे चांगलेच फावले आहे. यात शिक्षण विभागातील काही बड़े अधिकारी, कर्मचार्‍यांचाही समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

२ हजारांवर उमेदवारांची फसवणूक?

नाशिक विभागातील अंदाजे १५०० ते २००० उमेदवारांकडून या दलालांनी एक ते तीन लाख याप्रमाणे या १५ ते १६ कोटी रुपये गोळा केल्याचे समजते. या दलालांच्या घरातून टीईटीचे ओळखपत्रदेखील आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु , यामुळे शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र बदनाम होत आहे. पोलीसानी दलालांचा शोध घेऊन त्यांच्या घराची झाडाझडती घेतल्यास किंवा त्यांच्या मालमत्तेची चौकशी केल्यास प्रत्येक जिल्ह्यातही या महाघोटाळ्याचे धागेदोरे हमखास उलगडू शकतील.

टीईटी घोटाळा प्रकरणातील तुकाराम सुपे यांनी शिक्षण क्षेत्राला काळिमा फसणारे पराक्रम केले आहेत .त्यामूळे मंत्रायल शिक्षण विभाग ते राज्यातील सर्व विभाग यातील आजीमाजी अधिकार्‍यांच्या व दलालांच्या चौकशी केल्यास घबाड निश्चितपणे सापडेल. अनेक मासे गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.
– नीलेश साळुंखे, अध्यक्ष, नाशिक पॅरेन्ट्स असोसिएशन

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -