घरताज्या घडामोडीशेतकर्‍यांचे पैसे खाऊन कधी जेलमध्ये गेलो नाही

शेतकर्‍यांचे पैसे खाऊन कधी जेलमध्ये गेलो नाही

Subscribe

दिनकर पाटील यांचा देविदास पिंगळे यांच्यावर घणाघाती आरोप

गंगापूर पंचक्रोशितील सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी खासदार देविदास पिंगळे यांनी पैशांच्या बळाचा वापर करुन विजय मिळवल्याचा गंभीर आरोप विकास पॅनलचे प्रमुख दिनकर पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही तर देविदास पिंगळे यांनी आई-वडीलांना स्मरुण सांगावे की, बाजार समितीच्या कर्मचार्‍यांचे पैसे खावून आम्ही कधी जेलमध्ये गेलो आहे का? पिंगळेंनी नाशिक साखर कारखाना असेल नाशिक जिल्हा बँक किंवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकर्‍यांचे पैसे लाटल्याचा गंभीर आरोपही त्यांनी देविदास पिंगळेंवर केला. त्यामुळे निवडणूक संपल्यानंतर आता खर्‍या अर्थाने आखाडा रंगणार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेचा सोमवारी (दि. २०) निकाल जाहीर झाला. यात गंगापूर, महिरावणी, दुगाव, मुंगसरे व मातोरी येथे मतदानाचे बुथ होते. मखमलाबाद येथे विकास पॅनलचा उमेदवार नव्हता. तरीही तुमच्या पॅनलचे तानाजी पिंगळे पराभूत का झाले? याचा खुलासा पिंगळे यांनी करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. येथील बुथवर पिंगळेंना ४०० मते मिळाली. तरीही तानाजी पिंगळे पराभूत कसे झाले आणि तुम्ही मतदारांना किती पैसे वाटले याचा खुलासा करण्याची मागणीही पाटील यांनी केली. नैतिकतेच्या आधारावर आमचे उमेदवार लढले. उगाच लोकांची दिशाभूल करु नका. पंडीत कातड यांना उमेदवारी दिली. त्यांची संपूर्ण पार्श्वभूमी जनतेला सांगा. आमच्यावर नाही ते आरोप केले. पण देविदास पिंगळे यांना सेंट्रल गोदावरी ही घरची मालमत्ता वाटते. त्याच संस्थेच्या निवडणुकीत पिंगळे यांना एकट्या दिनकर पाटीलने ‘सळो की पळो’ करुन सोडले. याची नोंद घ्या.

- Advertisement -

तुमच्याच एवढी हिंमत होती तर बिनविरोध का निवडून आले. समोरासमोर लढायला हवे होते. इतर पाटलांसारखा मी षंढ पाटील नाही. मुरलीधर पाटील यांनी स्वत:च्या मुलाची माघार घेतली आणि देविदास पिंगळे यांच्या बाजूने जातात. दशरथ पाटील हा माझा सख्खा भाऊ असला तरी माझ्या विरोधात प्रचार केला. ज्ञानेश्वर पाटील हा सख्खा चुलत भाऊ आणि विलास शिंदे हे सोयरे माझ्या विरोधात पिंगळेंच्या बाजूने असताना दिनकर पाटील डगमगला नाही. मला घाबरण्याचे कारण नाही, कारण माझ्यावर कुठलाही शिंतोडा उडालेला नाही. देविदास पिंगळे यांच्यासारख्या भ्रष्टाचारी माणसाला कधीच घाबरणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला. घाबरणारा माणूस स्वत: बिनविरोध निवडूण येतो आणि सांगतो की, माझा पॅनल विजयी झाला. दादागिरीला थारा नाही दिला! अजूनही हिम्मत असेल तर मोठ्या गटात चार उमेदवारांची निवडून लावावी, कोण निवडून येतं ते बघू, असा इशाराच त्यांनी पिंगळेंना दिला. येणार्‍या बाजार समितीच्या निवडणुकीत पैशांचा वापर करु नका, कसे निवडूण येता तेच बघतो, असा इशाराही त्यांनी दिला.

चुंभळेंचा अन् माझा संबंध नाही

दिनकर पाटील हे चुंभळेंच्या सांगण्यावरुन लढत असल्याचा आरोप पिंगळे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, चुंभळेंचा माझा काहीच संबंध नाही. त्यांचा कुठेही साधा फोटो आम्ही वापरला नाही. त्यामुळे त्यांच्याशी आमचा संबंध जोडू नका, असेही त्यांनी निक्षूण सांगितले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -