घरमहाराष्ट्रनाशिकचार आकड्याभोवती फिरते शिवसेनेचे राजकारण

चार आकड्याभोवती फिरते शिवसेनेचे राजकारण

Subscribe

जिल्ह्यातील 15 पैकी चार जागांवर कायम राहिले वर्चस्व; षटकार मारण्याची उत्सुकता

नाशिक : एखाद्या व्यक्तीला विशिष्ट क्रमांक फार भाग्यशाली असल्याचे भाकित आजही वर्तवले जाते. या राजकीय भविष्यावर दृढ विश्वास ठेवणार्‍या व्यक्ती किंवा पक्ष त्या आकड्यांभोवती पिंगा घालताना दिसताना. शिवसेना या पक्षाने आजवर जिल्ह्यात लढवलेल्या निवडणुकांमध्ये त्यांना चार हा आकडा अधिकृतपणे ओलांडता आलेला नाही.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून 1966 रोजी स्थापन झालेल्या सेनेनी 1990 पासून मुंबईबाहेर पाऊल ठेवले. या वर्षी झालेल्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात बबनराव घोलप यांच्या रुपाने पहिली जागा देवळाली मतदारसंघातून जिंकली. मात्र, पक्षाच्या पहिल्याच निवडणुकीत तब्बल पाच उमेदवारांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली. यात निफाडमध्ये गंगाधर शिंदे, येवल्यात अरुण थोरात, नांदगावमध्ये अशोक रसाळ, दिंडोरीत रामदास खेताडे, दाभाडीत अशोक निकम यांचा समावेश आहे. सेनेचे उमेदवार पराभूत झाले तरी, त्यांचे राजकीय भविष्य उज्वल असल्याचे मानले जाऊ लागले. पक्ष कार्यकर्त्यांनी गाव तेथे शाखा मोहिमच सुरु केल्यामुळे यापुढील निवडणुकांमध्ये शिवसेना प्रबळ पक्ष म्हणून उतरला. 1995 च्या निवडणुकीत शिवसेनेनी जिल्ह्यातील चार जागा जिंकत आपले अस्तित्व निर्माण केले. यात नांदगावचे राजेंद्र देशमुख, येवला-कल्याणराव पाटील, निफाडचे रावसाहेब कदम व देवळाली मध्ये बबनराव घोलप निवडूण आले होते. खर्‍या अर्थाने निवडुकिला सामोरे गेलेली शिवसेना आता ग्रामीण भागात रुजत असल्याचे एक चित्र त्याकाळी निर्माण झाले.

- Advertisement -

काँग्रेस व राष्ट्रवादी हा पारंपारिक विचारांचा पक्ष सोडून राकट आणि कामगार वर्गाचा पक्ष म्हणून शिवसेना झपाट्याने विस्तारली. पुढे 1999 च्या निवडणुकीत येवल्यामध्ये पाटील व निफाडमध्ये रावसाहेब कदम यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी कदम यांनी आपला गड कायम राखला. तर सिन्नरमध्ये अ‍ॅड.माणिकराव कोकाटे यांनी बाजी मारली व देवळालीत घोलप यांनी अपक्ष विजय मिळवला. तसे म्हटले तर पाच उमेदवार दिसतात, पण घोलप अपक्ष निवडूण आल्यामुळे खर्‍या अर्थाने याही निवडणुकीत चार उमेदवार पक्षचिन्हावर विजयी झाले. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे बघितले गेले. या निवडणुकीत देवळाली, सिन्नरची जागा कायम राखली व त्यासोबत संजय पवार (नांदगाव), काशिनाथ मेंगाळ (इगतपुरी) हे दोन नवे मतदारसंघ जोडले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यमान ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे हे दाभाडी मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. कालांतराने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

2009 मध्ये निफाडकरांनी पुन्हा शिवसेनेला कौल दिल्याने अनिल कदम आमदार झाले. दादा भुसे व बबनराव घोलप यांनी विजयी पताका कायम राखली तर दिंडोरीत धनराज महाले यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. यापूर्वी झालेल्या चार निवडणुकांमध्ये शिवसेनेला जिल्ह्यात चार जागांवर सिमित रहावे लागले. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, सेना युती झाल्यामुळे अभुतपूर्व यश मिळाले. मात्र, त्यानंतर विधानसभेत युती दुभंगली आणि दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. यात शिवसेनेला पुन्हा चारच जागा मिळाल्या, हे विशेष. मालेगाव, देवळाली, निफाडच्या उमेदवारांनी आपला गड राखला आणि सिन्नरमध्ये राजाभाऊ वाजे यांचा उदय झाला. आजवर 24 वर्षांच्या राजकारणात शिवसेनेला चार हाच आकडा ओलांडता आलेला नाही. येत्या निवडणूकीत वाढीव जागांचा दावा करणारी सेना चौकाराचे रुपांतर षटकारात करणार की नाही? हे निवडणूक निकालांनंतर स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -