घरमहाराष्ट्रनाशिकपर्यटन वृध्दीने वाढतील रोजगाराच्याही संधी

पर्यटन वृध्दीने वाढतील रोजगाराच्याही संधी

Subscribe
स्मार्ट सिटीच्या मार्गावर असलेल्या नाशिकचे बलस्थान म्हणजे येथील वातावरण आणि शहराला लाभलेले धार्मिक महत्व. मंत्रभूमी ते यंत्रभूमी आणि रुद्राक्ष ते द्राक्षनगरी असा प्रवास करणार्‍या नाशिकमध्ये पर्यटनासाठी अतिशय पूरक वातावरण आहे. पौराणिक संदर्भ, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वारसा आणि आल्हाददायक हवामानासह वाइन कॅपिटल सिटी म्हणून मिळविलेला लौकिक यामुळे नाशिकमध्ये पर्यटकांचा नेहमीच ओढा असतो. त्यातच शहरात स्मार्ट सिटीच्या दृष्टीने कामे सुरु झाल्याने पर्यटन वाढीचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. निओ मेट्रो, सीएनजी आणि इलेक्ट्रीक बसेसमुळे शहरातील प्रदूषण कमी होणार आहेच, शिवाय वाहतुकीचा खोळंबाही मिटणार आहे. महत्वाचे म्हणजे पर्यटन वाढीमुळे रोजगाराच्या संधी देखील वाढणार असून त्यादृष्टीने आता शासन आणि महापालिकेने भविष्यातील नियोजन करणे गरजेचे आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त नाशिकची बलस्थाने आणि पर्यटन वृध्दीसाठीच्या आवश्यक बाबी यांचा घेतलेला धांडोळा.
मंदिरांचे शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिकमध्ये पर्यटकांची संख्या दिवासागणिक वाढत चालली आहे. नाशिकचे अनुकूल हवामान आणि शहराला प्राप्त असलेले सर्वच प्रकारचे महत्व लक्षात घेता देशातील प्रमुख पर्यटनस्थलांमध्ये नाशिकचा उल्लेख होणे क्रमप्राप्त होते. परंतु, राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या औदासिन्यतेने शहर अजूनही पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेले नाही. परिणामत: पर्यटनासाठी पूरक असलेल्या नाशिकच्या परिस्थितीचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. नाशिक खर्‍या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी पर्यटन विकासाला चालना देणे गरजेचे आहे.
पर्यटन क्षेत्राचा विकास-
नाशिक जिल्ह्यात २७ ठिकाणी पर्यटनाला वाव आहे. त्यात घाटनदेवी, कावनाई, अनकाई किल्ला, मांगीतुंगी, रामशेज, कोटमगाव, नस्तनपूर, ओझरखेड, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, सप्तशृंगीगड, नांदूरमध्यमेश्वर, सर्वतीर्थ टाकेद, गोंदेश्वर, जोंगलटेंभी, गिरणारे, भगूरचा समावेश आहे. त्यासाठी एकूण १८० कोटींचे नियोजन आहे.
शहरासह जिल्ह्यातील पुरात मंदिरांचे व्हावे नूतनीकरण-
शहरातील सुंदरनारायण मंदिर, श्री नीलकंठेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील बल्लाळेश्वर गणपती मंदिर, त्रिभुवनेश्व मंदिर, इंद्रोळेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव पुरातत्व विभागाने शासनाला दिला होता.
काय आहे नाशिकमध्ये
गोदावरी-
ब्रह्मगिरी डोंगरातून उगम पावलेली गोदावरी नाशिकमधून जाते. धार्मिक पौराणिक व ऐतिहासिक महत्व लाभलेल्या नदीची लांबी १४७५ किलोमीटर आहे.
महाआरती 
हरिव्दारच्या धर्तीवर नाशिकमधील गोदावरीची आरती सुरु करण्यात आली आहे. पुरोहित संघ आणि पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे. याआरतीच्या निमित्ताने नाशिकचे ब्रॅण्डींग होणार आहे.
मंदिरे-
त्र्यंबेकेश्वरासह अंजनेरी, रामकुंड, सप्तशृंगीदेवी, काळाराम मंदिर, सीतागुंफा, गोदावरी मंदिर, सोमेश्वर अशी अनेक प्रमुख मंदिरे आहेत.
ऐतिहासिक स्थळे-
रामशेज, हरिहर व हातगड किल्ल्यांसह अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. पेशवेकालीन वाड्यांमुळेदेखील नाशिकचा लौकिक वाढला आहे.
सिंहस्थ कुंभमेळा-
देशभरात चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. त्यात नाशिक- त्र्यंबकचा समावेश आहे. त्याचादेखील फायदा शहर विकासासाठी होत आहे.
फाळके स्मारक-
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी नाशिक आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने ११ एकरवर पांडवलेणीच्या पायथ्याशी स्मारक बांधण्यात आले आहे.
१०८ फूटी श्री ऋषभदेवाची मूर्ती-
जैन धर्मियांचे महत्वाचे धार्मिक स्थळ मांगीतुंगीच्या डोंगरांवर आहे. मांगीतुंगीच्या मांगी या शिखराच्या खालच्या टप्प्यावर जगातील अखंड दगडातील सर्वात उंच १०८ फूटी श्री ऋषभदेवाची मूर्ती सध्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. त्यात १३ फुटाचे कमळ व १०८ फूट उंचीची १२१ फूट उंचीची मूर्ती पाहताना नवल वाटते.
नाशिक बाल येशू- 
ख्रिस्ती बांधवांचे श्रध्दास्थान असलेले बाल येशूचे चर्च नाशिकरोडला आहे. बाल येशूची यात्रा जगात झकोस्लाव्हिया देशाच्या प्राग शहरात व नाशिकरोड येथेच ही यात्रा भरते. या यात्रेला परदेशातूनही भाविक नाशिकमध्ये येतात.
नांदूरमध्यमेश्वर
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून याची ओळख आहे. येथील धरणावर अंदाजे २३८ प्रकारचे पक्षी भ्रमंती करत येतात, असे पक्षीमित्र सांगतात.
बोटक्लब-
गंगापूर धरण परिसरात बोट क्लब सुरु करण्यात आला आहे. काही कारणास्तव हा बोटक्लब बंद असला तरी सुरु झाल्यावर पर्यटन वृध्दीसाठी त्याचा मोठा फायदा होऊ शकणार नाही.
सायकल शेअरिंग-
सायकल शेअरिंग उपक्रमांतर्गत आजवर ७० हजार ९६ नागरिकांनी स्मार्ट सिटी कंपनीकडे नोंदणी केली आहे. सायकल शेअरिंग देशाच्या विविध शहरांत राबवण्यात आला असला तरीही तो केवळ नाशिक शहरातच यशस्वी झाला आहे६. शहरात आजवर १ लाख २२ हजार वेळा सायकल्स चालवण्यात आल्या आहेत.
पक्षी निरीक्षण-
गंगापूर धरण परिसरात विविध ठिकाणांहून अनेक स्थलांतरित पक्षी येतात. त्यामुळे पक्षीप्रेमींसाठी येथे अद्ययावत पक्षी निरीक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.
काय असणे गरजेचे-
  • धार्मिक विधींपासून ते उद्योग
  • व्यवसायाच्या निमित्ताने येऊन पर्यटन करणार्‍यांची संख्या नाशिकमध्ये मोठी आहे. त्यादृष्टीने शहराचे आणखी बँडिंग करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी या काही उपाययोजनांची गरज आहे.
  • नाशिकचा स्वतंत्र लोगो असावा-
  • नाशिक परिसराची वेगळी ओळख ठसविण्यासाठी नाशिकचा स्वतंत्र लोगो तयार करणे गरजेचे आहे.
  • नाशिकमध्ये येणार्‍या देश- विदेशांतील पर्यटक व भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी शहरात परिपूर्ण पर्यटन माहिती केंद्र असावे.
  • वीकेंड टुरिझमची संकल्पना
नाशकात अल्हाददायक हवामानासोबत निवास भोजनासाठी उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने वीकेंड टुरिझमसाठी प्रयत्न व्हावेत. या अांतर्गत जिल्ह्यातील सौंदर्यस्थळांचा प्रचार करणे गरजेचे आहे. सर्व पर्यटनप्रेमींनी एकत्र येऊन नाशिक विकास पर्यटन प्राधिकरणाची निर्मिती करावी.
पुरेशी वाहतूक व्यवस्था-
नाशिकमधून जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात जाण्यासाठी संपूर्ण व्यवस्था आहे. मात्र अन्य ठिकाणांहून नाशिकमध्ये येण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. मुलभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. विशेषत: नाशिकमधून नाईट लॅण्डींग सुरु होणे गरजेचे आहे. मुंबई नाशिक लोकल सेवा सुरु झाल्यास नाशिकचा विकास होण्यास फार वेळ लागणार नाही.

कौटुंबिक पर्यटनाला चालना देण्यासाठी फॅम टूर
नाशकात कौटुंबिक पयर्र्टनाला चालन देण्यासाठी पर्यटन विकास संस्थेने फॅम टूर संकल्पना रुजविण्याची आवश्यकता आहे. तसेच, काही रस्त्यांवर सप्ताहातून एकदा फॅन स्ट्रीट सारखे उपक्रम राबवावेत. त्यातून नागरिकांना मनसोक्त आनंद मिळेल.

काय होणार…

निओ मेट्रो ट्रेन-
सार्वजनिक वाहतुकीला बळकटी देण्यासाठी मेट्रोच्या धर्तीवर नाशिकमध्ये ‘मेट्रो निओ’चा महत्वकांक्षी प्रकल्प महामेट्रोने हाती घेतला आहे. जगात अशा प्रकारे प्रथमच टायरबेस मेट्रो बस प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी गंगापूर ते नाशिकरोड आणि गंगापूर ते सीबीएसमार्गे मुंबईनाका, असे दोन मार्ग विकसित केले जाणार आहेत. अर्थात हे मार्ग जमिनीवरचे नसून हवेतील (पूलस्वरुपात) असतील. या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
  • प्रोजेक्ट गोदा-

स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदी संवर्धन व सुशोभीकरणासाठी प्रकल्प राबवण्यात येत आहे. यात गोदाघाटाला पौराणिक स्वरुप देण्यासाठी दगडी पेव्हर ब्लॉक, दगडी बेंच बसविले जातील. त्यासोबत सायकल ट्रॅक, पदपथ, नामफलक, वृक्षारोपण, आकर्षक कारंजे निर्मिती, नदी स्वच्छता, अहिल्यादेवी होळकर पुलाखालील बंधार्‍यांच्या गेटवर स्वयंचलित यांत्रिकी दरवाजे, हनुमान घाट ते रामवाडी दरम्यान पूल, चिंचबन ते हनुमानवाडी पादचारी पूल तसेच अरुणा व वाघाडी नदीसाठी वळणघाट आदी १८ कामे केली जाणार आहेत.

  • वन सिटी वन कार्ड-

‘वन नेशन वन कार्ड’च्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ‘वन सिटी वन कार्ड’ ही योजना नाशकात लागू करण्यात येणार आहे. यात क्रेडीट वा डेबीट कार्डप्रमाणे नागरिकांना स्मार्ट कार्ड दिले जाईल. या कार्डच्या माध्यमातून महापालिकेचे विविध कर, पार्किग शुल्क, बसचे भाडे यांसह व्यावसायिक दालनांमध्येही खरेदी करता येणार आहे.

- Advertisement -
  • नाशिक स्मार्ट रोड

अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल या १.१ किलोमीटर परिसरात स्मार्ट रोड साकारण्यात येत आहे. काँक्रीटचा रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांसाठी जागा, सायकल ट्रॅक, पदपथ, बसचे आकर्षक थांबे, लक्षवेधी पथदीप आदी बाबींचा समावेश या स्मार्ट रोडमध्ये असेल.

स्मार्ट सिटी-

२९९४.६४ कोटींची स्मार्ट सिटीची कामे केली जाणार
४३५ कोटींचा निधी स्मार्ट सिटीसाठी प्राप्त
३१.६० कोटींच्या निधीचा वापर विविध कामांसाठी करण्यात आला

आगामी काळात या योजना राबवल्या जाणार-
-गावठाण विकासासाठी क्लस्टर योजना
-झोपडपट्टी पुर्नविकासासाठी एसआरए योजना
– अभिनव भारत मंदिराचा पुर्नविकास
– काळाराम मंदिरावर लेसर शो

नंबर गेम-

३८- जिल्ह्यातील वायनरी
०१ कोटी लिटर वाइन उत्पादन क्षमता
०७ लाख लिटर निर्यात होणारी वाइन
१० चित्रपटगृहे शहरात
०४ आकाशवाणी केंद्रे
०५- नाट्यगृहे शहरात
३२५ हॉटेल्स
६०० रेस्टारंट अ‍ॅण्ड बार
१०० लॉजिंग
६४- ट्रॅव्हल एजन्सी
पर्यटन वृध्दीने वाढतील रोजगाराच्याही संधी
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -