घरमहाराष्ट्रनाशिकजोर ओसरला, विसर्ग घटला

जोर ओसरला, विसर्ग घटला

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम

गंगापूर धरण ८४ टक्के भरल्याने धरणातून मंगळवारी दिवसभर पाण्याचा विसर्ग सुरूच होता. त्यामुळे गोदावरीला पूर परिस्थिती कायम होती. सायंकाळपर्यंत गंगापूर धरणातून ९ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आल्याने दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले. मात्र, सोमवारच्या तुलनेत धरणाच्या वरच्या भागात पावसाचा जोर कमी झाल्याने रात्री उशिरापर्यंत हा विसर्ग हळूहळू कमी करण्यात आला. असे असले तरी गोदावरीला पूरपरिस्थिती कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४३.७३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दारणा धरण ८७ टक्के भरले असून धरणातून ९ हजार २६४ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. तर होळकर पुलाखालून सकाळी ११ वाजेपर्यंत ९ हजार ४६९ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता मात्र,गंगापूर धरणाच्या वरील भागात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठया प्रमाणावर पाणी येत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव गंगापूरमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला, परिणामी होळकर पुलाखालून गोदावरी पात्रात १२ हजार ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही कमी करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत अजूनही धरणांमध्ये अपेक्षित साठा नसला तरी गेल्या चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक होत असल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मागीलवर्षी याच दिवशी जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये ५६ टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली होती.

- Advertisement -

पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची मोठया प्रमाणावर आवक झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून धरणक्षेत्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सकाळच्या सुमारास गोदाकाठच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने रामकुंड परिसरातील लहान मंदिरे, पूल पाण्याखाली बुडाले. दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले. नाशिक शहरात आज दिवसभर अधूनमधून पावसाची हजेरी कायम होती. अधूनमधून नागरिकांना सूर्यनारायणाचे दर्शन घडले. मात्र, काही वेळाच्या विश्रांतीने पुन्हा पावसाने हजेरी लावली. रात्री पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास हा विसर्ग आणखी कमी करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जायकवाडीसाठी ५८ हजार क्युसेक

गंगापूर, दारणा, भावली धरणातून सोडण्यात येणार पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यात येते. तेथून पाणी जायकवाडीकडे जाते. नांदूरमध्यमेश्वरमधून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीने रौद्ररूप धारण केल्याचे दिसून येत आहे. धरणाचे पाच गेट उघडण्यात येऊन हे पाणी पुढे जायकवाडीकडे प्रवाहित करण्यात येत आहे. सायंकाळी ६ नंतर हा विसर्ग घटवण्यात येऊन ५० हजार क्युसेक करण्यात आला. रात्री पावसाचा जोर कमी झाल्यास हा विसर्ग आणखी कमी करण्यात येईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisement -

धरणातून करण्यात येणारा विसर्ग

धरण विसर्ग (क्युसेक)

  • भावली १५०९
  • नांदूरमध्यमेवर ५००००
  • होळकरपूल १२०००
  • कडवा २७१८
  • पालखेड २८१०
  • पुनद २८९५

पाणलोट क्षेत्रातील पाऊस (मि.मी)

  • गंगापूर ८४
  • कश्यपी ४२
  • गौतमी ४०
  • त्र्यंबकेश्वर ३७
  • आंबोली ७९

मंगळवारी दिवसभरातील पाउस

तालुका पाऊस (मि.मी.)

  • येवला १.४
  • नांदगाव २
  • सिन्नर १२
  • सटाणा ४
  • इगतपुरी ८८
  • सुरगाणा ३८
  • त्र्यंबकेश्वर ३७
  • दिंडोरी १६
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -