घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यातील २१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना तडाखा

जिल्ह्यातील २१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना तडाखा

Subscribe

प्राथमिक अहवाल प्राप्त : पुरामुळे जिल्हाभरातील २१ हजार हेक्टर क्षेत्र बाधित, ४,४५० घरांचेही झाले मोठे नुकसान

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः जिल्ह्यातील १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील भातपीक वाहून गेले. या महापुराने जिल्ह्यातील सहा तालुक्यांना जबर फटका बसला. या पावसाने जिल्ह्यातील ३१ हजार शेतकर्‍यांचे २१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. आधीच दुष्काळाने संकटात सापडलेल्या बळीराजासमोर आता अतिवृष्टीवृष्टीने दुहेरी संकट उभे ठाकले आहे.

जिल्ह्यात १५ दिवसांत जोरदार पाऊस झाला. यामुळे धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने गोदाकाठच्या नागरिक, व्यासायिकांना याचा जबर फटका बसला. निफाड तालुक्यातील अनेक गावांत पाणी शिरले. नाशिक शहरात गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले. यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले. जिल्ह्यातील जवळपास चार हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. पावसाचा जोर ओसरला असून गोदावरी पुराची धोक्याची तीव्रता कमी झाली असली तरी, पूर परिस्थिती कायम आहे. दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अद्यापही नागरिकांचे संसार पूर्वपदावर येऊ शकलेले नाहीत. अनेकांच्या घरातील पाणी वाहून गेल्याने नागरिकांनी आवरासावर सुरू केली असली तरी, २५७१ नागरिक अद्यापही तात्पुरत्या निवाराशेडमध्ये वास्तव्यास आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या नागरिकांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्य शासनाच्या निर्देशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार काही तालुक्यातील पंचनाम्यांचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शेती पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसून येते. अनेकांच्या शेतात काही फुटांपर्यंत पाणी गेल्याचे पिके सडू लागली आहेत, तर चारा भिजल्याने सडू लागला आहे. या पुरामुळे पशुहानीही मोठ्या प्रमाणावर झाली असून ९६ जनावरे दगावली आहेत. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक, दिंडोरी, पेठ, निफाड या सहा तालुक्यांत नुकसानीची तीव्रता अधिक आहे, तर सिन्नर, मालेगाव, बागलाण, कळवण, सुरगाणा, देवळा, चांदवड, येवला तालुक्यात काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्याप पंचनामे करण्यात येत असून दोन दिवसांत हे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. पंचनाम्याच्या अहवालानंतर नुकसानीचे मूल्यमापन करण्यात येऊन शासनाला अहवाल पाठवण्यात येणार आहे.

पिकनिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)

जिरायती : भात : 12,160, मूग : 117, उडीद : 15, बाजरी : 148.5, कापूस : 02, माक : 1282, सोयाबीन : 3084, तूर : 2.50, भूईमूग : 98, खुरासणी : 07, वरई : 111, नागली : 76. वार्षिक फळपिके :- स्ट्रॉबेरी : 0.50, पपई : 0.50 बागायती : भातरोपे : 0.05, उस : 2342, भाजीपाला : 1813. डाळिंब : 23.40, पेरू : 0.41, द्राक्ष : 44.57.

- Advertisement -

४,४५० घरांचे नुकसान

पावसामुळे नाशिक शहरासह ग्रामीण भागात घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली. यात सर्वाधिक घरांचे नुकसान निफाड तालुक्यात झाले. तालुक्यात २२६५ घरांचे नुकसान झाले. नाशिकमध्ये ९६४, इगतपुरी १३४, त्र्यंबकेश्वर ९६, दिंडोरी १९६, पेठ १४५, सिन्नर ६२, चांदवड १२, देवळा ८, येवला ७, मालेगाव ३६, बागलाण ३४०, कळवण १५२, सुरगाणा ३३ घरांचे नुकसान झाले.

इगतपुरीत पिके पाण्यात

जिल्ह्यात शेतीपिकांचे सवाधिक नुकसान इगतपुरी तालुक्यात झाले. सुमारे १० हजार ३४९ हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्यात गेली. तालुक्यात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्या पाठोपाठ निफाड तालुक्यात ६ हजार २१७ हेक्टर, नाशिक २५७३ हेक्टर, त्र्यंबकेश्वर ६२०, दिंडोरी ४०० हेक्टर, पेठ ५५९ हेक्टर, मालेगाव ५३८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -