घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा बँकेविरोधात ग्रामीण पतसंस्थांचा एल्गार

जिल्हा बँकेविरोधात ग्रामीण पतसंस्थांचा एल्गार

Subscribe

बँकेतील ठेवी परत मिळवण्याच्या मागणीसाठी १५ जुलै रोजी बांधकाम बंद ठेवून करणार आंदोलन

मनमाड बँकेत ठेवी असलेली रक्कम मिळावी या मागणीसाठी १५ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व पतसंस्थाचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच नाशिक येथे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याची माहिती नाशिक विभागीय नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी दिली.

मनमाड शहरात रविवारी सहकारी पतसंस्था फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, जिल्ह्यातील पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा बँकेत ठेवी असलेली रक्कम न मिळाल्यामुळे पतसंस्था अडचणीत सापडल्या आहेत, याबाबत उहापोह करण्यात आला. यावेळी सुशील गुजराथी, दीपक गोगड, प्रकाश गवळी, सुरेश बारसे, गोपाळ पाटील, साधना गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकार्‍यानी मनोगत व्यक्त केले. नोटबंदी नंतर जिल्हा बँक अडचणीत सापडली होती. मात्र, आता बँकेला पैसे मिळाले असतानादेखील पतसंस्थाना पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे पतसंस्थाना कामकाज करणे कठीण झाले आहे. सभासद व ग्राहकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेत ठेवी असलेली रक्कम बुडणार नाही. मात्र, गेल्या साडेचार वर्षांपासून रक्कम अडकल्यामुळे पतसंस्था अडचणीत सापडल्या आहेत. जिल्हा बँकेचे पदाधिकारी, संचालक यांच्यासह शासनाकडेही दाद मागण्यात आली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एकीकडे जिल्हा बँक पैसे देत नाही, तर दुसरीकडे सदस्य व ग्राहक पैशांची मागणी करतात. अशा दुहेरी कात्रीत पतसंस्था सापडल्या असल्याचे मत फेडरेशनच्या पदाधिकार्‍यानी व्यक्त केले. पतसंस्थांची अडकेलेली रक्कम मिळावी यासाठी एकत्रितपणे लढा देण्याची गरज असून त्यासाठी १५ जुलै रोजी सर्व पतसंस्थांचे कामकाज बंद ठेवून नाशिक येथे जिल्हा बँकेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली. यावेळी फेडरेशनचे सुरेश वाभळे, गोपाळ पाटील, प्रकाश गवळी, प्रदीप बोगावत, संतोष पांडे, भास्कर झाल्टे, बाबासाहेब दराडे, नरेश फुलवानी, काका गांधी, साधना गायकवाड, दीपक गोगड आदी उपस्थित होते. हेमंत गवळे यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -