घरमहाराष्ट्रनाशिकपुनद जलवाहिनी : हायकोर्टाचे आदेश असूनही 'पीडब्लूडी'ने रोखले

पुनद जलवाहिनी : हायकोर्टाचे आदेश असूनही ‘पीडब्लूडी’ने रोखले

Subscribe

परवानगी न घेताच काम सुरू केल्याचा आक्षेप, रस्त्याच्या साईडपट्टीचा वापर होत असल्याचे कारण

कळवण शहरासाठी पुनद धरणातून जलवाहिनीच्या कामाला उच्च न्यायालयाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली नसल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला. यामुळे शनिवारी (दि.६) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी हे काम थांबवले.

जलवाहिनी योजनेच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषद व अन्य विभागांची परवानगी न घेता रस्त्यालगत जलवाहिनी टाकण्यासाठी मशिनरीद्वारे साईडपट्टी खोदून चारी करण्यात येत आहे. विना परवानगीने बेकायदेशीर काम सुरू असल्याने तात्काळ बंद करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे यांच्याकडे केली होती. दरम्यान, विना परवानगीने काम सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने काम बंद केले असून संबंधितांना नोटीस दिली आहे.

- Advertisement -

या संदर्भात कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन विना परवानगीने सुरू असलेले काम तात्काळ बंद करून सटाणा नगरपालिका मुख्याधिकारी व जलवाहिनी योजनेचे ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आमदार जे.पी.गावित, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, तालुकाप्रमुख अंबादास जाधव, माकपचे सेक्रेटरी हेमंत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, संदीप वाघ, जितेंद्र वाघ, किशोर पवार, विलास रौंदळ, संदीप पाटील यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन काम बंद करण्याची मागणी केली. राज्यमार्ग 21 वरील साखळी क्रमांक 37/00 ते 39/500 दरम्यान चुकीचे व बेकायदेशीर पद्धतीने जलवाहिनी योजनेचे काम चालू केलेले असून राज्यमार्ग लगत जलवाहिनीचे काम करताना विनापरवानगीने साईडपट्टी खोदून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यावरून माती टाकण्यात आली आहे. रस्त्याच्या मर्यादित सीमेनुसार संबंधित विभागाची परवानगी घेऊन जलवाहिनी मार्ग ठरवून कामकाज करणे आवश्यक असताना सर्व निकष डावलून परस्पर रस्त्यालगत साईडपट्टी खोदून अडीच किलोमीटर घाईघाईने काम करून मनमानी चालवली असल्याने वेळोवेळी हरकत घेऊन देखील विनापरवानगी कामकाज चालू ठेवल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -