घरमहाराष्ट्रनाशिकसाहित्य संमेलनात मूळ हेतूचाच बळी दिला जातो: कौतिवराव ढाले-पाटील

साहित्य संमेलनात मूळ हेतूचाच बळी दिला जातो: कौतिवराव ढाले-पाटील

Subscribe

९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनावर ढाले पाटलांकडून जोरदार टिका

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादसारखे नाशिकमध्येही साधे व लोकांचे व्हावे अशी अट होती. प्रत्यक्षात आयोजक शब्दाला जागले नाहीत. साहित्य महामंडळाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा उशीर झाला होता. पंचतारांकित साहित्य संमेलनाच्या नादात साहित्य महामंडळाच्या हेतूचा व धोरणाचा बळी दिला. नाशिकने निधी संकलनाचा नवा फॉर्म्युलाच उदयाला आणला. निधी संकलनात लोकसहभागाची गरजच ठेवली नाही.

एखाद्या मंत्र्याला किंवा सत्तेतल्या वजनदार नेत्याला स्वागताध्यक्षपद बहाल केले की साहित्य संमेलन कम राजकीय नेत्यांचे संमेलन झोकात साजरे झालेच म्हणून समजा, अशी टीका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी महामंडळाच्या ‘अक्षरयात्रा’ या नियतकालिकातील अध्यक्षीय मनोगतात केली आहे. नाशिकला ३ ते ५ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समाचार घेताना ठाले यांनी टोकदार वक्तव्ये केली.

- Advertisement -

कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले की, सार्वजनिक वाचनालय नाशिक न्यायालयीन प्रकरणात असल्याचे कळल्यावर जेव्हा चार पदाधिकारी लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण घेऊन आले तेव्हा उस्मानाबादच्या संमेलनाचे उदाहरण ठेवून आटोपशीर संमेलन घ्यावे, राजकीय नेत्यांचा वावर व्यासपीठावर नसावा, असे आग्रहपूर्वक सांगितले होतेे. मात्र, कोरोनामुळे आर्थिक बाबीचा विचार करता आम्हाला स्वागताध्यक्षापुरती फक्त एका नेत्याची मुभा द्यावी, अन्य कोणत्याही नेत्याला व्यासपीठाचा वापर करू देणार नाही, असे आश्वासन लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी साहित्य महामंडळाला दिले होते.

प्रत्यक्षात ते शब्दाला जागले नाहीत. काहीजण पक्के व्यावसायिक व हिशेबी निघाले. त्यांनी आपली गणिते मांडून हिशेब केले. भपक्याच्या मोहात पडले, लोकांना दूर लोटले. उस्मानाबादच्या संमेलनाचा आदर्श एका वर्षात नाशिककरांनी मोडीत काढला. नाशिकचे संमेलन हे एकट्या मंत्री छगन भुजबळांचे झाले. सर्वसाधारण लोकांचे झाले नाही.

- Advertisement -

डॉ. जयंत नारळीकरांवरही नाराजी

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व स्वागत मंडळाची मोठी कोंडी करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. डॉ. नारळीकर संमेलनाला न आल्याने संमेलनाचे जे नुकसान झाले त्याबद्दल स्वागत मंडळाचे पदाधिकारीही खंतावले. डॉ. नारळीकर हे येणारच नाहीत हे मला उद्घाटनाच्या दिवशी सांगण्यात आले. परिणामी, मी डोक्यालाच हात लावला, असे कौतिकराव ठाले-पाटील यांनी मनोगतात म्हटले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -