घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबक मार्गावर अपघात टाळण्यासाठी एसटी बसला वेग मर्यादा; निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त निर्णय

त्र्यंबक मार्गावर अपघात टाळण्यासाठी एसटी बसला वेग मर्यादा; निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त निर्णय

Subscribe

नाशिक : कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी होणार्‍या त्र्यंबकेश्वर पौषवारीनिमित्त तीन ते चार लाख वारकरी भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असून यात्रेनंतर वारकरी हे एसटी बसने पुन्हा आपल्या गावाकडे परतात. दरम्यान, वाढत्या अपघाताच्या घटना विचारात घेता नाशिक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर एसटी बसेसना वेग मर्यादा घालून देण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

त्र्यंबकेश्वर येथे १८ जानेवारीला होणार्‍या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या ‘निर्मल वारी’ च्या बैठकीत ट्रस्टचे पदाधिकारी आणि वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. या बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांसह त्र्यंबकेश्वर नगरपरिषदचे अधिकारी, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा , एसटी, महावितरण विभाग, पोलिस दल आदी विभाग प्रमुखांसह पंचायत समितीच्या अधिकार्‍यांशी संवाद साधला. कोरोनापासून या यात्रोत्सवात खंड पडला होता. त्यामुळे तीन वर्षांनंतर होणार्‍या यंदाच्या यात्रोत्सवात सुमारे तीन ते चार लाख भाविक सहभागी होणार असल्याची शक्यता यावेळी ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. यात्रोत्सवात दर्शन बारीदरम्यान होणार्‍या गर्दीत उद्भविणारे प्रश्न, कुशावर्तावर स्नानासाठी आवश्यक असणारे स्वच्छ पाणी, पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूकीचा उडणारा फज्जा, वारीत चोरट्यांचा भाविकांना होणारा त्रास, वीज-पाणी आणि इतर सुविधांची आवश्यकता आदी प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

प्रतिनिधींनी संभाव्य अडचणी जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडल्यानंतर संबंधित विभागांना सूचना देत जिल्हाधिकार्‍यांनी निर्मल वारीसाठी पूर्वतयारीनिशी सज्ज रहाण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, त्र्यंबकेश्वरला प्रस्थान करणार्‍या दिंड्यांना शहरात अनेक ठिकाणी गायन-वादन अन् भजनास प्रशासनाच्या वतीने अटकाव करण्यात आला होता. कुठल्याही डीजेसारख्या यंत्रणेचा उपयोग वारकरी समुदाय करत नसताना प्रशासनाने अशी पावले उचलून वारकरी समुदायाच्या भावना दुखावू नये, असा स्पष्ट इशारा देत यंदाच्या यात्रेत दिंड्यांना प्रशासनाने आडकाठी करू नये, असे साकडे संत निवृत्तिनाथ महाराज ट्रस्ट तसेच त्र्यंबकेश्वर येथील पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांना घातले.दिंडीयात्रेत प्रशासनाकडून बाधा उद्भवणार नाही, याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले. त्याबाबत पोलिस अधिक्षक आणि पोलिस आयुक्त यांना सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीसाठी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांसह विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष निलेश गाढवे पाटील, सचिव अ‍ॅड. सोमनाथ घोटेकर, विश्वस्त नारायण मुठाळ, अरूण काळे, जयंत महाराज गोसावी, राहुल साळुंके, कांचन जगताप, व्ही.डी. गंगापुत्र आणि भानुदास गोसावी आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -