घरमहाराष्ट्रनाशिककांदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

Subscribe

करप्याने केला जिल्ह्यातील कांद्याचा वांदा

तुषार रौंदळ , सटाणा : कांद्याचे आगार समजल्या जाणार्‍या कसमादे पट्ट्यात यंदा उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असली तरीही मागील महिन्यातील बेमोसमी पाऊस आणि करपा रोगाचा प्रादूर्भाव यामुळे कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यापुढील चिंता वाढली आहे.

कसमादे पट्ट्यात नगदी पिक म्हणून उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. कांदा पिक हे तीन ते चार महिन्यात तयार होते. त्यामुळे या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. त्याअनुषंगाने नोव्हेंबरमध्ये कांदा लागवड सुरू होणार होती, परंतु बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने कांदा लागवड १५ ते २० दिवस लांबली. परिणामी डिसेंबरमध्ये एकाच वेळी लागवड सुरू झाल्याने मजुरांची प्रचंड कमतरता निर्माण होउन लागवड जानेवारीपर्यंत लांबली.

- Advertisement -

कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार उशिरापर्यंत चाललेल्या लागवडीमुळे यंदा विक्रमी कांदा उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनीही कंबर कसली होती. कांद्याला यंदा सुरुवातीपासूनच चांगला बाजारभाव असल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत शेतकर्‍यांनी समसमान क्षेत्रात कांदा लागवड केली. मात्र निसर्गाचा लहरीपणा, खराब हवामान यामुळे कांदा पिक मोठ्या प्रमाणावर खराब झाले. कांदा पिकात कोणतीही सुधारणा होत नसल्याने तब्बल ३०-४० टक्के कांदा उत्पादन घटण्याची भीती आहे.

भाजीपाल्याकडे शेतकर्‍यांनी फिरवली पाठ

भाजीपाला पीक कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे असुनही लॉकडाऊनच्या भितीमुळे शेतकर्‍यांनी भाजीपाल्याच्या लागवडीकडे पाठ फिरवली. सुरुवातीला कांदा पिक वातावरण चांगले असल्यामुळे जोमात होते. मात्र, वातावरणाच्या बदलामुळे कांदा पिकावर मावा, करपा, गेड्या वळणेपिवळेपणा अशा रोगांनी आक्रमण केले आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला सापडला. कांदाही गेला आणि भाजीपाला पीकही गेले, त्यामुळे आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

कांदाचाळी रिकाम्याच राहणार?

नोव्हेंबरमध्ये लागवड केलेल्या कांद्याची सध्या काढणी सुरू आहे. ऊन्हाळी कांदा आणि पावसाळ्यातील मका या दोनच पिकांवर शेतकर्‍यांची मदार असते. यंदा अवकाळी पावसामुळे करपा पडtन कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. यंदा बहुतांश शेतकर्‍यांच्या चाळी कांद्याअभावी रिकाम्याच राहतील की काय, अशी भीतीही वर्तविली जात आहे.

रोहीत्र जळण्याचे वाढले प्रमाण

गेल्या काही दिवसांपासून वारंवार विद्युतपुरवठा खंडित होऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी एकीकडे पाणी असुनही पिकांना पाणी देता आले नाही. तर, दुसरीकडे विहिरींनी तळ गाठल्याने कांदा पिकाची मोठी वाताहत झाली. त्यामुळे एकूणच अवकाळी पाऊस, करपा, खंडित वीजपुरवठा व विहिरींनी गाठलेले तळ यामुळे कांदा उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

कांदा लागवडीवेळी मजुरांची टंचाई जाणवली. परंतु त्यातुनही मार्ग काढत उन्हाळी कांद्याची लागवड केली. मात्र, सततच्या ढगाळ व अनियमित वातावरणामुळे कांद्यावर मावा व करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झालेला आहे. यामुळे फवारणीच्या खर्चात वाढ झाली. त्या प्रमाणात उत्पादन निघेल की नाही याबाबत साशंकता आहे. एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च आला असून बाजार भाव गडगडल्याने व वातावरणामुळे उत्पादनात घट होत असल्याने आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.

– प्रभाकर रौंदळ, शेतकरी, तरसाळी

मी दोन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली आहे. यंदा कांदापीक सुरवातीपासूनच जोमात होते. परंतु, अचानक आलेल्या पावसाने एकाच दिवसात होत्याचे नव्हते केले. ढगाळ वातावरणामुळे फवारणी करूननही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता काय करावे, कोणते पीक घ्यावे हा बिकट प्रश्न आहे.

– संदीप रौंदळ, शेतकरी, तरसाळी

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -