घरमहाराष्ट्रनाशिकहा तर कर्मवीरांचा अपमान; अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचे प्रत्युत्तर

हा तर कर्मवीरांचा अपमान; अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचे प्रत्युत्तर

Subscribe

नाशिक : कर्मवीर अ‍ॅड. बाबुराव ठाकरे यांनी केटीएचएम महाविद्यालयास जागा दिली नाही, असे नीलिमा पवार सर्वत्र सांगत आहेत. खरं म्हणजे या निवडणुकीत कर्मवीरांना गोवायलाच नको होते. त्यांच्या त्यागाची बरोबरी करणारा संस्थेत अजून जन्माला आलेला नाही. परंतु, कर्मवीर कोण आहे आणि कोण नाही, हेसुद्धा पवार कुटुंब सांगत असेल, तर ते मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या संस्थापकांचा व सभासदांचा अपमान आहे, असे मत अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले.
कर्मवीर रावसाहेब थोरात, अण्णासाहेब मुरकुटे, काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे या मराठा समाजाच्या कर्मवीरांनी बहुजन समाजासाठी नाशिक जिल्ह्यात ‘मविप्र’ची स्थापना केली.

पण ही संस्था जणू काही आपल्या परिवारानेच केली, असा आव पवार परिवाराकडून आणला जातो. या संस्थेचा लाभ बहुजन समाजाला मिळण्याऐवजी पवार परिवारानेच मोठ्या प्रमाणावर घेतला आहे. काही दिवसानंतर खाजगीकरणाकडे जाणारी ही संस्था रोखायची असेल तर ‘परिवर्तन’ पॅनलच्या उमेदवारांना मतदान करून कर्मवीरांचा सातत्याने अपमान करणार्‍यांना धडा शिकवा असे आवाहन परिवर्तन पॅनलचे नेते अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. व्यासपीठावर माणिकराव कोकाटे, बाळासाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

सभासद पालकाकडे पैसा नसतांनाही त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या घेऊन त्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न सातत्याने घटनाबाह्य ‘तीन’ सरचिटणीसांकडून होत असतो. त्यामुळे संस्थेत सध्या झालेले सत्तेचे एककल्ली केंद्रीकरण हे हुकूमशाहीकडे निघाले आहे. संस्था लोकशाही पद्धतीप्रमाणे चालली पाहिजे. दादा, ताई यांच्या ताब्यातून सामान्य सभासदांकडे गेली पाहिजे, असा घणाघात ठाकरे यांनी केला. सध्या बाह्यशक्तीचा सातत्याने नीलिमा पवार यांच्याकडून उच्चार केला जातो. ती बाह्य शक्ती म्हणजे नेमकी कोणती? याचे उत्तर त्या का देत नाही? बाह्यशक्ती तर कोपरगावची आहे की निवडून न आलेल्या मुलाची की हॉस्पिटलमध्ये लुडबुड करणार्‍या मेडिकल क्षेत्राचा अनुभव नसलेल्या मुलीची या जिल्ह्यातील मराठा समाजाचे सक्षम नेतृत्व संस्थेच्या निवडणूक मैदानात उतरले तर तुम्हाला ते बाह्य शक्ती वाटते, याचे दु:ख होते. विचारांची दिवाळखोरी झाल्यावर दुसरे काय होणार. शेतकर्‍यांच्या शेअर भांडवलाचे पैसे गोळा करून परस्पर नाईल म्हणजेच सोयाबीन प्रकल्प उभा न करता नाईलची तेरा एकर जमीन ज्यांनी हडप केली ती बाह्यशक्ती होती का? गंगापूर रोड येथील खतीब डेअरी समोरील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आर्किटेक कॉलेज करता राखीव असलेली साडेचार एकर जवळजवळ दोनशे कोटी रुपयांची जमीन परस्पर बिल्डरांच्या घशात घातली ती बाह्य शक्ती होती का? मेडिकल कॉलेजमधील डोनेशनच्या रकमा कुणालाही हिशोब न देता परस्पर घरी नेली जाते, ती बाह्य शक्ती होती का? असे अनेक सवाल जाहीर सभांमधून विचारले आहेत.

निफाड तालुक्यातील कसबेसुकेणे, चांदोरी, चितेगाव, शिंगवे, सोनगाव, करंजगाव, पिंपळस, कोठूरे, खेडलेझुंगे येथे परिवर्तन पँनलच्या सभासदांचे मेळावे संपन्न झाले. बापूसाहेब मोगल, अरविंद कारे, माजी आमदार कल्याणराव पाटील, नानासाहेब बोरस्ते, डी. बी. मोगल, विश्वास मोरे, शिवाजी गडाख, शोभा बोरस्ते, लक्ष्मण लांडगे, नंदकुमार बनकर, कृष्णाजी भगत, रमेश पिंगळे, संदीप गुळवे, प्रा. नानासाहेब दाते, मदनकाका पवार, रवींद्र देवरे, प्रवीण जाधव, यतीन कदम, माधवराव मोगल, बाजीराव भंडारे, लक्ष्मण भंडारे, विष्णुपंत उगले, गोपाळराव भंडारे, शंकरराव झांबरे, सुभाष गाडे, गणपत गाडे, बाळासाहेब देशमुख, सचिन मोगल, मोहन टर्ले, अमृता टर्ले, शिवाजी ठालकर, मोहन भोज, माणिकराव वनारसे, रमेश बकरे, नितीन गावले, विजय कारे, सुभाष कारे, वसंतराव मोगल, जगन पाटील, त्र्यंबक शिंदे, सुधा डेर्ले, साहेबराव रायते, गणेश सातभाई, आशिष मोगल, निवृत्ती मोगल, एकनाथ मत्सागर,सागर सुरवाडे, रामभाऊ सुरवाडे,शिवनाथ सदाफळ, राजेंद्र गोराडे, कैलास साबळे, जयदत्त होळकर, अरुण खंगारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -