घरमहाराष्ट्रनाशिकगंगापूररोडवर बिनदिक्कत अवजड वाहतूक, तरीही डोळेझाक

गंगापूररोडवर बिनदिक्कत अवजड वाहतूक, तरीही डोळेझाक

Subscribe

नाशिक : शहरांतर्गत रस्त्यांवर अवजड वाहतुकीला सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान बंदी असतानाही मोठमोठ्या ट्रक (हायवा), ट्रेलर, ट्रकची सर्रास वाहतूक सुरू आहे. दुर्दैव म्हणजे ज्यांच्याकडे कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, ते वाहतूक पोलीस पुतळ्यासारखे उभे असतात. त्यामुळे नियम फक्त सामान्यांसाठीच का, असा संतप्त सवाल नाशिककरांमधून उपस्थित होत आहे.

शहराचा विकास आणि विस्तार ज्या वेगाने होत आहे, त्या प्रमाणात पायाभूत सुविधांची मात्र पुरती बोंब आहे. एकाही यंत्रणेला शहरविकास आणि शहरातील समस्या सोडविण्यात रस नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांपासून वाहतूक कोंडीचा फास अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. याला गंगापूर रोडदेखील अपवाद नाही. कधीकाळी एकही सिग्नल नसलेल्या या रोडवर तीन-तीन सिग्नल बसवूनही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. याउलट ही परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे.

- Advertisement -

रस्त्यांची रुंदी वाढवितानाच रस्त्यावरील पार्किंग, अतिक्रमणे, बेशिस्त वाहनचालकांचा बंदोबस्त करण्याची अत्यंत गरज आहे. तसे झाले तरच गंगापूर रोडला लागलेले कोंडीचे ग्रहण सुटेल अन्यथा पुण्यातील रस्त्यांप्रमाणेच हा रस्त्याही समस्येस गुरफटून जाईल.

ट्रकचालकांचा शॉर्टकट

पाथर्डी फाट्यावरुन पेठ किंवा दिंडोरी रोड हे अंतर कापण्यासाठी एक तासांहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे बहुतांश ट्रक पाथर्डी फाटा ते अंबड लिंक रोड ते बारदान फाटा आणि गंगापूररोड-चोपडा लॉन्समार्गे पुढे असा शॉर्टकट मारतात. यामुळे हायवेवरील पोलिसांचा ससेमिराही चुकतो आणि इंधनाचीही मोठी बचत होते. शिवाय मध्ये कुठेही माल उतरवायचा असल्यास कुणी जाब विचारत नाही. मनाला वाट्टेल तेथे ही वाहने रस्त्याकडेला थांबून अपघातांना निमंत्रण देतात. दुसरीकडे रविवार कारंजा, पंचवटी कारंजा अशा अत्यंत गर्दीच्या भागांत भरदिवसा ट्रक रस्त्यावर थांबून मालाची चढ-उतार करतात. मात्र, व्यापार्‍यांच्या मनमानीपुढे कुणाचेही काही चालत नाही.

वाहतूक कोंडीची समस्या वेळीच सोडविली नाही तर केबीटी सर्कल चौकात आंदोलन केले जाईल. अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीची समस्या कायम असून, त्याबाबत एकाही यंत्रणेला गांभीर्य नाही. शहराचा विस्तार होताना रस्त्यांच्या क्षमतेचाही विचार होणे गरजेचे असते. मात्र, नाशिकमध्ये बहुतांश रस्त्यांची रुंदी १५ वर्षांपासून वाढलेली नाही. वाहतुकीचा भार दुपटीपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका यंत्रणेने भविष्याचा विचार करत संयुक्तपणे आराखडा तयार करणे गरजेचे आहे. अन्यथा नाशिकचे पुणे झाल्याशिवाय राहणार नाही. : अ‍ॅड. पंकज जाधव, स्थानिक नागरिक 

- Advertisement -

सीसीटीव्ही कशासाठी?

शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये प्रगत तंत्रज्ञानाने परिपूर्ण सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. या यंत्रणेच्या शुभारंभाला मुहूर्त कधी मिळणार आणि ही यंत्रणा सुरू झाली असेल तर कारवाई कधी करणार, असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित होत आहे. सिग्नल जम्प करण्याचे प्रमाण पाहता ही यंत्रणा बंद स्थितीत आहे की काय, असा प्रश्न पडतो. वाढते अपघात, बेशिस्त वाहतूक रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनीच आता पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -