घरठाणेThane Accident : ठाण्यात कंटेनरचा अपघात, चालकाचा मृत्यू; वाहतूक खोळंबली

Thane Accident : ठाण्यात कंटेनरचा अपघात, चालकाचा मृत्यू; वाहतूक खोळंबली

Subscribe

ठाणे: भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने पुढे असलेल्या दुसऱ्या कंटेनरला मागून जोरात धडकत दिली. या अपघातात धडक मारणाऱ्या कंटेनर चालक मज्जिद खान (40) याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील पातलीपाडा, होरायझन प्राइम हॉस्पिटल समोर घडली. या अपघाताने घोडबंदर रोडने ठाण्याच्या दिशेकडे येणाऱ्या वाहतुकीला तब्बल दोन तासांसाठी ब्रेक लागला होता. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

मयत कंटेनर चालक मज्जिद खान आणि क्लिनर निसार शेख हे दोघे राजस्थान येथून कंटेनरमध्ये 10 टन वजनाचे कापड घेऊन नवी मुंबई न्हावा-शेवा येथे निघाले होते. ते शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरून जात होते. पातलीपाडा येथे येताना चालक मज्जिद याने गुजरात येथून 18 टन वजनाची सोलार मशीन घेऊन नवी मुंबई न्हावा शेवा येथे निघालेल्या कंटेनरला मागून जोरात धडक दिली.

- Advertisement -

ही धडक इतकी जोरात होती की चालक मज्जिद याचा केबिनमध्ये अडकून जागी मृत्यू झाला. ते दोन कंटेनर रस्त्यावर बंद पडल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली होती. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी, कापूरबावडी वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. तसेच अपघातामध्ये अडकून जागीच मृत्यू झालेल्या गुजरात येथील मयत वाहनचालक मज्जिद खान याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात दिला.

तसेच अपघातग्रस्त वाहने क्रेन मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आल्यावर तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. जवळपास दोन तास रस्त्यावरील वाहतुक बंद होती, याचदरम्यान सर्व्हिस रोड वरून वाहतुक धिम्या गतीने सुरू होती. त्यानंतर पहाटेच्या सुमारास वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरू झाली अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साधला विरोधकांवर निशाणा, म्हणाले – कोणाच्याही पोटात दुखलं तर…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -