घरमहाराष्ट्रनाशिकप्रभाग ३० मधील इच्छुकांच्या गर्दीत कुणाची लॉटरी?

प्रभाग ३० मधील इच्छुकांच्या गर्दीत कुणाची लॉटरी?

Subscribe

रणधुमाळी प्रभाग ३०

नाशिक : नाशिक शहर आणि नवीन नाशिक यांच्या मध्यावर असलेल्या गोविंदनगर व नवीन नाशिकच्या जुन्या परिसराच्या संयोगातून प्रभाग ३० ची रचना झाली आहे. यात जुन्या प्रभाग क्रमांक २४ च्या ८० टक्के व प्रभाग क्रमांक २५ च्या २० टक्के भागाचा समावेश आहे. या प्रभागात शिवसेनेचे प्राबल्य असले तरी आगामी निवडणुकीत शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रभागात शिवसेना व भाजपकडून ३ जागांसाठी अर्ध्या डझनाहून जास्त प्रबळ व इतर इच्छूक उमेदवार प्रयत्न करीत आहेत. तशीच काहीशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या गोटात आहे. त्यामुळे प्रभाग ३० मधून अवघ्या तीन जागांसाठी डझनावारी इच्छूक झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

प्रभाग ३० हा दाट लोकवस्तीचा असून त्यात उच्च, मध्यम व आर्थिक दुर्बल घटकांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के संख्या मध्यमवर्गीय गटात मोडणारी असून त्यात नवीन नाशिक मधील कामगार वसाहतीचा समावेश झाला आहे. याशिवाय खोडे मळा, बडदे नगर, महाले फार्म, कर्मयोगी नगर या अलीकडच्या काळातील नवविकसीत भागात मागील काही वर्षात बांधकामांचे इमले उभे राहिल्याने प्रभागाच्या लोकवस्तीत झपाट्याने वाढ झाली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे या भागात कसमादेसह खान्देश भागातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे निवडणुकीत कसमा व खान्देशचे मतदान निर्णायकी ठरत आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रभाग ओळखला जात असला तरीही सध्या या प्रभागात शिवसेने पाठोपाठच राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस मनसेसह सर्वच पक्षांनी शक्ती पणाला लावलेली आहे. २०१७ ला झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने तीन जागा जिंकून प्रभागात आपले वर्चस्व सिद्ध केले होते. तोच धागा पुढे पकडून शिवसेनेकडून आपले वर्चस्व राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जाणार असले तरी आपले प्राबल्य वाढविण्याचे अन्य पक्षांचे प्रयत्न दुर्लक्षित करून चालणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कितीही राजकीय उलथापालथ झाल्या तरी सातत्यपूर्ण जनसंपर्क, आणि काम करण्याच्या वेगळेपणामुळे राष्ट्रवादीच्या राजेंद्र महाले यांनी प्रभागात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

शिवसेनेचे प्रवीण तिदमे, कल्पना पांडे व कल्पना चुंभळे यांच्या रूपाने शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व ठेवले होते. तथापि कल्पना पांडे यांचे कोरोना काळात निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त आहे. कोरोनाचा काळ व निवडणुका डोळ्यासमोर असल्याने येथे पोटनिवडणूक होऊ शकलेली नाही. मागील काळात प्रभागातील रस्ते, पाणी, पथदीप, अभ्यासिका या मूलभूत सुविधा सोडविण्याचा प्रयत्न झालेला असला तरी नगरसेवकांमधील विसंवादाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागात कचरा, सांडपाणी, पथदीप उद्याने, ड्रेनेजसारख्या मूलभूत समस्यांचे निराकरण होऊ शकलेले नाही हे कटू वास्तव आहे.

- Advertisement -

आगामी निवडणुकीत विद्यमान शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना चुंभळे, नगरसेवक प्रवीण तिदमे, माजी नगरसेविका सीमा बडदे, दिवंगत कल्पना पांडे यांच्या कन्या शिवानी पांडे, जनहिताच्या कामात सातत्याने पुढाकार घेणारे बाबासाहेब गायकवाड, चारुशीला गायकवाड, मागील निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकाची मते घेणारे कैलास चुंबळे यांच्यासह शंकर पांगरे, स्वप्नील पांगरे, सुशील बडदे अशी इच्छुकांची मोठी यादी झाली आहे. भाजपकडूनही इच्छुकांसह प्रबळ दावेदारांची संख्या लक्षवेधी आहे. त्यात आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे, ज्येष्ठ नेते जगन पाटील, अन्याय, अत्याचार आणि भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात सातत्याने आवाज उठविणारे अ‍ॅड. अजिंक्य गीते, युवाशक्तीचा चेहेरा असलेले शैलेश साळुंखे, कोरोना काळात अव्याहत काम करणारे राहुल गणोरे, रवी पाटील, संगीता पाटील, यशवंत नेरकर, सुरेखा नेरकर, राम पाटील, वैभव बडदे, जगू पांगरे, शीतल विसावे, शिला पारनेरकर अशा नामावळीचा समावेश आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठांसमोर उमेदवार निवडीचे एक वेगळे आव्हान रहाणार आहे, यात शंका नाही. राष्ट्रवादीकडून विद्यमान नगरसेवक राजेंद्र महाले यांच्यासह अमोल महाले, अमर वझरे, सुनील अहिरे, सागर मोटकरी आदी इच्छुकांच्या रांगेत आल्याने राष्ट्रवादीची बलवृद्धी झालेली दिसत आहे. काँग्रेसच्या गोटात माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांच्यासह निवडणुकांचा अनुभव असलेले अशोक टिळे, पवन टिळे, शाहरूख शहा हेही तयारीला लागले आहेत. मनसेकडूनही विजय रणाते, सुनिता रणाते, अक्षय खांडरे, हरिश पांगरे, प्रवीण मोरे अशा नव्या-जुन्या इच्छुकांचे लॉबिंग सुरू झाले आहे. याशिवाय अभय गवळी, तुषार जगताप हेदेखील तयारीत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -