घरमहाराष्ट्रनाशिकनायलॉन मांजामुळे यंदाही जीवघेणी संक्रांत

नायलॉन मांजामुळे यंदाही जीवघेणी संक्रांत

Subscribe

काँग्रेस सेवादलाची पोलीस आयुक्तांना निवेदन

नाशिक :  शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजाने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असून, पोलीस प्रशासनाने याकडे अद्याप दुर्लक्ष आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये नायलॉन मांजाचा फास पडल्याने गळा चिरून दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस येथील उड्डाणपुलावर घडली होती. यंदा कोणाचाही बळी जावू नये, यासाठी पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करुन मांजा जप्त करावा, अशी मागणी नागरिक करु लागले आहेत.

मकर संक्रांत जवळ आले की मांजा विक्री सुरु होते. पोलीस प्रशासनाकडून नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे शहरात अनेक भागांत नायलॉन मांजाचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. त्यामुळे नायलॉन मांजाचा काळाबाजार होत असल्याचेही स्पष्ट होत आहे. जुने नाशिक परिसर आणि पंचवटी कारंजा, भद्रकाली, सातपूर, सिडको परिसर आणि उपनगरातील काही भागांत कागद किंवा पिशवीत नायलॉन मांजा गुंडाळून ग्राहकांना दिला जात आहे. मुलांच्या हातात दिसणार्‍या मांजामुळे काळाबाजार समोर येत आहे. मांजा विक्रीसाठी ‘गट्टू’, ‘पाकीट’, ‘पक्का धागा’ असे अनेक सांकेतिक शब्दांचा वापर केला जात आहेत. शहरात अनेक ठिकाणी रात्री उशिरा मांजाची विक्री केली जात आहे. प्रशासनाला शंका येऊ नये यासाठी, कागदामध्ये गुंडाळून अगदी साध्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी ग्राहकांना मांजा दिला जात आहे. मकर संक्रांत जवळ आली की पोलीस कारवाई करतात. त्या तुलनेत नाशिकमध्ये छुप्या पद्धतीने मांजा विक्री सुरु आहे. पोलिसांनी कायमस्वरुपी मांजावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

- Advertisement -

मुलांना सहज मिळतो मांजा मग पोलिसांना का नाही?

संक्रांत जवळ आली की मुलांना छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा कोठे आणि कोणाकडे मिळतो, हे माहिती असतेे. त्यानुसार मुले त्यांच्याकडून मांजा खरेदी करतात. शहरात कोणत्या ठिकाणी मांजा विकला जातो, याची पोलिसांना माहिती नसते. पोलिसांकडून कारवाईसाठी ठावठिकाणे सांगण्याचे आवाहनही केले जाते. मात्र, जो मांजा मुलांना सहज मिळतो तो पोलिसांना का मिळत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

- Advertisement -

विक्रेत्यांवर मोक्कान्वये कारवाई करा

मकर संक्रांतीनिमित्त शहरात पंतगांची बाजारपेठ सज्ज झाली आहे. पतंग विक्रीसाठी वेगवेगळ्या धाटणीचे पतंग बाजारात उपलब्ध झाले आहेत. मांजा आणि पतंग घेण्यासाठी मोठ्या संख्येने नाशिककरांची गर्दी होत आहे. मात्र, नायलॉनचा मांजा वापरला जिल्ह्यात बंदी असून अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जाते. त्यामुळे नायलॉन मांजा विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर मोक्कान्वये कारवाई करावी या मागणीचे निवेदन काँग्रेस सेवा दलाच्यावतीने पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय यांना देण्यात आले. नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेकांचे गळे चिरले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक पक्ष्यांचेही बळी या मांजाने घेतले आहेत. त्यामुळे धोकेदायक ठरणार्‍या या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. नायलॉन मांजा अनेकांच्या जीवावर बेतला आहे. त्यामुळे अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात. याबाबत अनेकदा जनजागृती करूनही छुप्या पध्दतीने मांजाची विक्री केली जाते अशा विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवायी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सेवा दलाचे शहराध्यक्ष डॉ. वसंत ठाकुर, सचिन जाधव, संतोष ठाकुर, मिलींद वाबळे, दत्ता कासार आदी उपस्थित होते.

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -