घरमहाराष्ट्रअजित पवार.. निसर्गावर प्रेम करणारा स्पष्टवक्ता नेता - जयंत पाटील

अजित पवार.. निसर्गावर प्रेम करणारा स्पष्टवक्ता नेता – जयंत पाटील

Subscribe

अजितदादांची आणि माझी पहिली भेट १९९० च्या दरम्यान झाली. त्यावेळी दादा खासदार होते. पुढे मी, अजितदादा, दिलीप वळसे-पाटील, आर. आर. पाटील आम्ही चौघांनी एकत्र आमदार म्हणून शपथ घेतली. आम्ही चौघे त्यावेळी २८-३० वयाचे होतो. त्यानंतर अजितदादा सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जलसंधारणाच्या कामात संपूर्ण राज्याचे दौरे केले. १९९५ ला काँग्रेसचे सरकार जाऊन आम्ही विरोधी पक्षात आलो. त्यावेळी आम्हा युवकांच्या घोळक्याने बसलेल्या आमदारांना पत्रकार ‘अशांत टापू’ म्हणायचे.

१९९७-९८ च्या दरम्यान मी राज्य सहकारी साखर संघाचा अध्यक्ष झालो तर अजितदादा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. तेव्हा आम्ही दोघांनी संपूर्ण राज्याच्या सहकारी संस्था आणि साखर कारखान्यांनाचा दौरा केला, या दौऱ्यात आम्ही अगदी बंद पडलेल्या संस्थेपासून ते उत्तम पद्धतीने चाललेल्या संस्थांपर्यंत सगळीकडे भेटी देऊन राज्याचा सहकार अधिक खोलात जाऊन समजून घेतला. लोक मोठ्या उत्स्फूर्तपणे आमचे स्वागत करीत. एका कारखान्यात तर ऊसच नव्हता पण केवळ आम्हाला दाखवण्यासाठी त्या दिवसापुरता कारखाना सुरू केला गेला ! का तर राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांना कारखान्याकडे ऊस नाहीये, असं वाटू नये म्हणून! आम्ही राज्यभर केलेल्या या दौऱ्यांचा आम्हाला पुढे खूप फायदा झाला.

- Advertisement -

१९९९ साली आम्ही सर्वजण कॅबिनेट मंत्री झालो. पवारसाहेबांनी आम्हा सर्व तिशीतील तरुणांच्या हातात मोठ्या विश्वासाने महाराष्ट्र सोपवला आणि तिथून पुढचे पंधरा वर्षे आम्ही सातत्याने कष्ट घेतले. पण मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना दादांचे संघटनेकडे कधीही दुर्लक्ष झाले नाही. संघटनेतील बारीक सारीक गोष्टींकडे दादांचे कायम लक्ष असायचे.

अजितदादांचं निसर्गावर फार प्रेम आहे. कुठल्याही संस्थेत गेल्यावर ते चेयरमनच झाडं लावली नसतील तर का लावली नाहीत याचं पहिलं ऑडिट करतात! कोणतंही झाड पाहिल्या पाहिल्या ते झाड कशाचं आहे, त्याचे काय फायदे आहेत हे दादा लगेच सांगू शकतात. स्वच्छता, निटनेटकेपणा हा दादांचा स्थायीभाव आहे. अजितदादांच्या वेळेवर कोणतंही माणूस आपलं घड्याळ लावू शकतो, इतके ते वक्तशीर आहेत.

- Advertisement -

दादा स्पष्टवक्ते आहेत. एकदा माझ्या मतदारसंघात सभा होती आणि त्या सभेला अजितदादा, आर. आर. पाटील उपस्थित होते. या सभेत दादांनी आर. आर. आबांच्या तंबाखूच्या व्यसनावर टिका केली. तिथे उपस्थित असणाऱ्या अनेकांना दादांचं ते बोलणं आवडलं नाही, मात्र काही वर्षांपूर्वी आर. आर. पाटील यांच्यासारखा उमदा नेता आपण गमावला तो केवळ या तंबाखूमुळेच! त्यावेळी अजितदादांचं ऐकलं असतं तर आज आबा आपल्यात असले असते.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने आम्ही ब्राझील, अमेरिकेत संशोधनसंस्था पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तिथल्या प्रत्येक नाविन्यपूर्ण गोष्टींचे दादांना आकर्षण असायचं, तिथली प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा असायची.

दादांना महाराष्ट्रातील गोरगरीब व्यक्तींच्या बद्दल कणव आहे, स्पष्ट बोलून धाडसी निर्णय घेण्याची त्यांची सवय आहे. असे निर्णय घेतल्याबद्दल त्यांना त्याची योग्य ती किंमतही चुकवावी लागली आहे. कोणतीही चूक प्रांजळपणे मान्य करण्याचा त्यांचा स्वभाव आहे.

दादांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर धडाकेबाज निर्णय होऊन आज राज्यात दिसणारी बेरोजगारी, अर्धवट प्रकल्प आणि योजनांचा ढिसाळपणा नाहीसा होऊन राज्याचा गतिमान विकास होईल यात शंकाच नाही. अजितदादांना निरोगी दीर्घायुष्य लाभो याच भावनेसह त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !?


लेखक जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -