घरमहाराष्ट्रनाशिकमराठी साहित्य संमेलनाची नाशिकला हुलकावणी

मराठी साहित्य संमेलनाची नाशिकला हुलकावणी

Subscribe

उस्मानाबादने मारली बाजी; नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात नाराजी

सांस्कृतिक क्षेत्राची पंढरी समजण्यात येणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पर्वणीस नाशिककर मुकले आहेत. ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये रंगणार आहे. साहित्य संमेलनाची तारीख अद्याप निश्चित नसली तरी जानेवारी महिन्यात संंमेलनाचे आयोजन होणार आहे, अशी माहिती सोमवारी (ता.२२) औरंगाबाद येथे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनासाठी नाशिकला हुलकावणी मिळाल्याने नाशिककरांचा हिरमोड झाला आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी व संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलन व्हावे, याकरता मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेने अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. ९३ व्या साहित्य संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद या चार ठिकाणांहून संमेलनाची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन मागण्यांचा साहित्य महामंडळाकडून प्राधान्याने विचार करण्यात आला होता. स्थळ निवड समितीने पाहणी अहवाल महामंडळाकडे सादर केला होता. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी बैठक न घेता अहवालासह परिपत्रक पाठवून थेट सर्व सदस्यांची मते जाणून घेतली. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्यासह १९ जणांनी एकमताने सहमती देत उस्मानाबादच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

- Advertisement -

२०२० मध्ये ९३ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला व्हावे, यासाठी सार्वजनिक वाचनालय, नाशिकनेे पाठपुरावा केला होता. त्यानुसार स्थळ निवड समितीने नाशिकमध्ये पाहणी केली. त्यामुळे नाशिककरांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, साहित्य महामंडळाच्या सदस्यांनी उस्मानाबादची निवड केली. त्यामुळे नाशिककरांचा हिरमोड झाला आहे.

पुढील संमेलनासाठी निमंत्रण देणार

साहित्य संमेलनाचे यजमानपद उस्मानाबादला मिळाल्याने त्याचा आनंद नाशिककर व ‘सावाना’ला आहे. दुष्काळी भाग म्हणून वाट्याला येणार्‍या वेदना सोसतच उस्मानाबादवर अन्याय झाला होता. अनेक वर्षे मागणी करूनही साहित्य संमेलनापासून उस्मानाबाद वंचित होते. संमेलनासाठी ‘सावाना’च्या वतीने अधिकाधिक नाशिककर जाणार आहेत. २०२१ चे निमंत्रण नाशिककरांच्या वतीने देण्यात येणार आहे. – जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष, सावाना.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -