घरमहाराष्ट्रनाशिकनिवृत्तीनाथ महाराज पालखी अंतिम टप्प्यात; करकंबच्या रिंगण सोहळ्यात भक्तीचा महापूर, वरूण राजाचीही...

निवृत्तीनाथ महाराज पालखी अंतिम टप्प्यात; करकंबच्या रिंगण सोहळ्यात भक्तीचा महापूर, वरूण राजाचीही जोरदार हजेरी

Subscribe

नाशिक : सोलापूर जिल्ह्यातील दगडी अकोला येथे संत निवृत्तीनाथ रथ मुक्कामी होता. रविवारी सकाळी ७:३० वाजता दगडी अकोला येथून पालखीने प्रस्थान ठेवले व परिते या गावी पालखी थोड्या कालावधीसाठी विसावली. याठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या चांदीच्या रथाला आंब्याच्या फळाचे सुंदर तोरण बनविण्यात आले. तिथून पुढे पालखी करकंब या ठिकाणी आली. सकाळपासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणवत होते. वारकरी गेल्या २२ दिवसांपासून पावसाची वाट पाहत होते. अखेर तो दिवस उगवला. आकाशात काळे ढग जमा झाले होते. रिंगण सोहळा सुरू होताच पावसाला प्रारंभ झाला. वारकर्‍यांनी मनापासून दिलेली हाक पांडुरंगाने ऐकली. वरूण राजाने मनसोक्त जलाभिषेक केला.

प्रेम… अमृताची धारवाहे । देवाही समोर ॥ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती घेत वैष्णव जलाभिषेक व भक्ती रसात न्हावून निघाले. करकंब येथील रिंगण सोहळ्यात सुमारे ७० हजार वारकरी उपस्थित होते. सुरुवातीला तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन महिला वारकर्‍यांनी व झेंडे पताका मिरवत वारकर्‍यांनी रिंगणाला प्रदक्षिणा मारली. देवाचा अश्व व स्वाराचा अश्व यांनाही रिंगणाचा मार्ग सुरुवातीला दाखवला गेला. त्यानंतर वारकर्‍यांनी फेर धरत ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत रिंगण सोहळ्याला प्रारंभ केला.

- Advertisement -

स्वाराचा घोडा वायू वेगाने दौडत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होता. त्यातच रिंगण सोहळ्यावर वरूणराजा बरसला आणि वारकर्‍यांच्या आनंदाला उधाण आले. रिंगण सोहळ्यावर अशा रितीने वरूणराजाने अभिषेक केल्याने या सोहळ्याला चार चांद लागले. हरी नामाचा गजर करत वरुणराजाच्या साक्षीने देवाच्या अश्वाने निवृत्तीनाथांच्या पादुकांवर मस्तक टेकविले आणि वारकर्‍यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. या पालखी सोहळ्यासाठी निवृत्तीनाथ संस्थांचे अध्यक्ष निलेश महाराज गाडगे सचिव सोमनाथ घोटेकर, पालखी प्रमुख हभप नारायण मुठाळ, विश्वस्त तथा प्रसिद्धीप्रमुख प्रा. अमर ठोंबरे, पालखी सोहळ्याचे मानकरी हभप मोहन महाराज बेलापूरकर, हभप रामकृष्ण महाराज लहवितकर, हभप बाळासाहेब देहूकर, विष्णू थेटे, संस्थानचे विश्वस्त हभप नवनाथ महाराज गांगुर्डे, माधवदास महाराज राठी, राहुल महाराज साळुंखे, कांचनताई जगताप, श्रीपाद कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. करकंब येथे पालखी सोहळ्याच्या मुक्कामी हभप माधवदास महाराज राठी यांचे कीर्तन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -