घरमहाराष्ट्रमुंबईत पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन; गिरीश महाजनांची माहिती

मुंबईत पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन; गिरीश महाजनांची माहिती

Subscribe

मुंबई : मुंबईत पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येण्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. मुंबई शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी दुबई शॉपिंग फेस्टीव्हलच्या धर्तीवर या पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून 20  ते 28 जानेवारी या कालावधीत मुंबई शहर आणि  उपनगरातील विविध विभागात मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची गिरीश महाजन यांनी सांगितले.

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी  आज सह्याद्री अतिथीगृह येथे गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये पर्यटन विषयावर विस्तृत चर्चा झाली. या भेटीनंतर महाजन यांनी मुंबईतील पर्यटन महोत्सवाची माहिती दिली.  या महोत्सवाच्या आयोजनासाठी  आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली फाउंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये मुंबईतील विविध क्षेत्रातील प्रथितयश भागीदार (स्टेक होल्डर)  सहभागी होणार असून  या महोत्सवामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी फाउंडेशनची स्थापना करावी अशी विनंती आनंद  महिंद्रा यांनी केली होती. या फाउंडेशनमध्ये शासकीय आणि  अशासकीय सदस्यांचा समावेश असेल. मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी फाउंडेशनच्या निर्मितीमुळे अशा महोत्सवांच्या आयोजनात सातत्य राहील.  त्यात भागिदारांचा  सहभाग वाढण्यास मदत होईल. हा महोत्सव यापुढे स्वयंपुर्ण लोकसहभागातून आयोजित होत राहील. आंतरराष्ट्रीय महोत्सवात पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यवसायिक, स्टेक होल्डर्स, मुंबईतील उद्योजक आणि  इतर क्षेत्रातील प्रथितयश  व्यक्तींच्या सहभागामुळे या पर्यटन महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळण्यास मदत होईल, असे महाजन म्हणाले.

राज्याच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला, राज्यातील विविध खाद्य संस्कृती, सायकलिंग  टूर, हार्बर टूरीझम,वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टीव्हीटीज्  यासारख्या साहसी क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात येईल.  या महोत्सवामध्ये सीटी टूर आयोजकांना एका छत्राखाली आणून  शॉपिंग मॉल, कला दालने, सिनेमा थिएटर, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाईडेड सीटी टूर, हेरिटेज वॉक,नेचर वॉक, फोटोग्राफी, योगा कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय आणि  आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यवसायिक तसेच  भागीदार  यांचा समावेश असलेल्या परिचय सहल, सिनेमा, फॅशन शो  आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – जनता दलाचे कार्यालय बच्चू कडू यांना, चळवळीचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न; कार्यकर्ते आक्रमक

या महोत्सवामुळे पर्यटना व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढीस मदत होईल.  राज्यातील पर्यटनाला चालना मिळून मुंबई आणि  परिसरातील पर्यटन स्थळांना प्रसिद्धी मिळेल. तसेच मुंबईतील पर्यटन वृध्दीस चालना मिळून  राज्याच्या महसूलात देखील वाढ होईल, असा विश्वासही पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केला.

मुंबई  शहराला फार मोठा प्राचीन इतिहास आहे, दरवर्षी बरेच पर्यटक मुंबईतील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी येत असतात. पर्यटकांना चांगल्याप्रकारे सोई सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.  या बैठकीला  पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील आणि  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा उपस्थित होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -