घरताज्या घडामोडीपुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण ! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन

पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण ! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन

Subscribe

पुणे :  पुणेकरांचे मेट्रो रेल्वेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. भूमिपूजनापासून पहिल्या टप्प्याची सेवा प्रवाशांसाठी खुली होण्यास इतर मेट्रो सेवांच्या तुलनेत पुणे मेट्रोलाच सर्वाधिक कालावधी लागल्याचे म्हटले जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत रविवारी बहुप्रतिक्षित पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. महापालिका निवडणुकांआधी डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन झाले होते. त्याचाच दाखला देत आधी भूमिपूजन व्हायचे. मात्र, उद्घाटन कधी होणार हे कळत नव्हते. परंतु इथे भूमिपूजन आणि उद्घाटनही माझ्याचा हस्ते झाले आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होणे खूप गरजेचे आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या खास शैलीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते गरवारे स्थानकातून पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तिकीट काढून गरवारे कॉलेज ते आनंद नगर या स्थानकादरम्यान मेट्रोतून प्रवासदेखील केला. या प्रवासादरम्यान मोदींनी विद्यार्थी व काही प्रवाशांशीही संवाद साधला. मोदी यांच्यासोबत यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील उपस्थित होते. प्रवास संपवून पंतप्रधान मोदी एमआयटी कॉलेज ग्राऊंडवर सभेसाठी रवाना झाले.

- Advertisement -

त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या दौर्‍यात त्यांनी 100 नव्या इलेक्ट्रिक बस, आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाच्या उद्घाटनासह मुळा-मुठा नदी सुधार योजना व इतर अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणीही केली. याशिवाय सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभातही ते सहभागी झाले.

महत्त्वांच्या पदावरील व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्ये- अजित पवार

मला पंतप्रधानांच्या लक्षात आणून द्यायचे आहे की, महत्त्वाच्या पदांवर असणार्‍या काही व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्ये केली जात आहेत, ते महाराष्ट्राला परवडणारे नाही. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो उद्घाटन कार्यक्रमात भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून पंतप्रधानांसमोरच तक्रार केली.

- Advertisement -

आमच्याकडूनही पैसे वसूल करा- देवेंद्र फडणवीस

आज पुण्याची आपली मेट्रो धावली आहे. या मेट्रोचे पाहिले तिकीट स्वतः पंतप्रधानांनी मोबाईलद्वारे पेमेंट करून काढले आणि त्यात प्रवास केला. पंतप्रधानांनी स्वतः तिकीट काढून प्रवास केला असताना आम्ही विनातिकीट प्रवास केल्याने संकोच वाटत आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने आमच्याकडूनही पैसे वसूल करून घ्यावे, असे पुणे मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले.

32.2 किमीची मेट्रो

एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन. 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा प्रकल्प.

काळे झेंडे दाखवून निषेध

मोदींच्या पुणे दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही मेट्रोतून प्रवास करताना एका इमारतीच्या गच्चीत चढून काही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मोदींना काळे झेंडे दाखवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -