घरताज्या घडामोडीराजकीय वैरी आता एकाच पंक्तीत; कांदेंसह गोडसेंचे भुजबळांशी सूत जुळणार का?

राजकीय वैरी आता एकाच पंक्तीत; कांदेंसह गोडसेंचे भुजबळांशी सूत जुळणार का?

Subscribe

नाशिक : राज्यातील राजकीय घडामोडींमुळे सत्तासमीकरणांची नव्याने मांडणी होणार आहे. यात सर्वाधिक कोंडी ही शिंदे गटाची होणार असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेली युती ही अनैसर्गिक असल्याचा आरोप करत शिंदे गट ठाकरे गटापासून वेगळा झाला. परंतु, आता त्याच राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसावे लागणार असल्याने शिंदे गटात अस्वस्था आहे. नाशिकचा विचार करता खासदार हेमंत गोडसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे हे भुजबळांचे राजकीय वैरी आता कसे जुळवून घेणार, हा खरा प्रश्न आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती ही अनैसर्गिक असल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी वेगळा गट स्थापन करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. राष्ट्रवादीकडून शिवसनेच्या आमदारांना विकास निधी देताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही शिंदे गटाने केला. मात्र, आज तेच राजकीय वैरी एकाच पंक्तीत आल्याने शिंदे गटाची मोठी अडचण झाली आहे. नाशिकचा विचार करता शिंदे गटाचे नांदगावचे आमदार सुहास कांदे व भुजबळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. नांदगावमधील पुरस्थितीबाबत झालेल्या बैठकीत निधीवरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याचा आरोप आमदार कांदे यांनी केला होता.

- Advertisement -

इतकेच नव्हे तर जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याप्रकरणी कांदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. हा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला. याचिका मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीने धमकी मिळाल्याची तक्रार कांदे यांनी पोलिसांकडे केल्याने या वादाला वेगळे वळण मिळाले होते. दोघाही नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडली नाही. आता हेच राजकीय वैरी एकाच पंक्तीत आल्याने कांदे कसे जुळवून घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पालकमंत्री भुसे आपल्याला महत्वाच्या बैठकांना बोलवत नाहीत, चुकीचे पदाधिकारी घेतल्याने शिंदे गटाचे नुकसान होत आहे, अशा शब्दांत आमदार कांदे यांनी भुसे यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे आता कांदेंच्या भूमिकेेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासदार गोडसेंचीही कोंडी

खासदार हेमंत गोडसे आणि भुजबळ हे एकमेकांचे राजकीय विरोधक. गेल्या निवडणुकांमध्ये गोडसे हे छगन भुजबळ व समीर भुजबळ यांचा पराभव जायंट किलर ठरले होते. नाशिकच्या राजकारणात विविध विकासकामांदरम्यान गोडसे-भुजबळ आमने-सामने येत असतात. केंद्र शासनाचा सीपेट प्रकल्प गोवर्धन शिवारातील जागेवर होऊ नये, असे पत्र तात्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासनाला देत विकासाला विरोध केला होता. भुजबळांचा हा खटाटोप पर्यावरण संवर्धानासाठी नव्हे, तर प्रस्तावित सीपेट प्रकल्पालगत शेजारच्या जागेत असलेल्या त्यांच्या शैक्षणिक संस्थेचे महत्त्व कायम राहावे, यासाठीच केल्याचा आरोप खासदार हेमंत गोडसे यांनी केला होता. आता हेच भुजबळ सत्तेत आल्याने नाशिकच्या राजकारणात गोडसे हे भुजबळांशी कसे जुळवून घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -