घरदेश-विदेशपबजीवर देशात बंदी!

पबजीवर देशात बंदी!

Subscribe

चीनच्या ११८ अ‍ॅप्सला केंद्र सरकारचे टाळे

लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना अस्वस्थ करणारा, अनेकांचे मानसिक स्वास्थ बिघडवणारा मोबाईल गेम पबजीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पबजीसोबतच सरकारने चीनच्या ११८ अ‍ॅप्सवरही बंदी घातली आहे.

भारताच्या या बंदीनंतर चायनीज अ‍ॅप्सची संख्या ही दोनशेच्यावर पोहोचली आहे. आज बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये पबजी शिवाय, लिविक, व्हीचॅट वर्क आणि व्हीचॅट रीडिंग, अ‍ॅपलॉक, केरम फ्रेंड्स यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

- Advertisement -

भारतात लहान, किशोरवयीन मुले, तरुण आणि काही ज्येष्ठ नागरिकांमध्येही पबजी या गेमचे मोठे वेड दिसून येते. काहींनी तर या पबजी गेमच्या वेडापायी आपले प्राण गमावले तर काहींनी आपले मानसिक स्वास्थ बिघडवून घेतले. या गेमवर बंदी आणण्याची मागणी देशभरातून होत होती. पबजीबाबत न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. मात्र, सरकारकडून त्यावर बंदी काही घालण्यात आली नाही. मात्र, चिनी सैनिकांकडून लडाखमध्ये आगळीक करण्याच्या घटना घडल्या आणि चिनी अ‍ॅपवर भारत सरकारने बंदी घातली. आता त्यात पबजी या गेमचाही समावेश करण्यात आला आहे.

मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फर्मेशन टेक्नोलॉजीने आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत सेक्शन ६९ए अंतर्गत या मोबाइलवर बंदी घातली आहे. या अ‍ॅपमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येत असल्याने केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. केंद्रातील मोदी सरकारने याआधी व्हीचॅट, टिकटॉक सह ५९ चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. चीन-भारत यांच्यात तणाव निर्माण झाल्यानंतर मोदी सरकारने हा निर्णय घेतला होता. देशातील युजर्सची खासगी सुरक्षा धोक्यात येत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा भारत सरकारने पबजीसह ११८ चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

- Advertisement -

भारत सरकारकडून जूनच्या अखेरच्या आठवड्यात ५९ चायनीज अ‍ॅप्सवर भारतात बंदी घातली होती. यानंतर या अ‍ॅप्सला भारतीय युजर्ससाठी गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल प्ले स्टोरवरून हटवण्यात आले. तसेच या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस संपूर्णपणे ब्लॉक करण्यात आला आहे. परंतु, भारताच्या या निर्णयावर चीनने नाराजी दर्शवली आहे. नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत या अ‍ॅप बंदीचा मुद्दा चीनने उपस्थित केला होता.

काय आहे पबजी?
पबजी म्हणजे प्लेअरअननोन्स बॅटलग्राऊंड. हा गेम मोबाईलवर तसेच कॉम्प्युटरवरही खेळता येतो. हा गेम जपानी चित्रपट बॅटल रॉयल या चित्रपटावर आधारित आहे. हा गेम प्रथम मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी मार्च-२०१७ मध्ये रिलिज करण्यात आला. २०१८ साली तो अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयओएससाठी काढण्यात आला. या गेमच्या २०२० पर्यंत ७ अब्ज कॉपी विकण्यात आल्या आहेत. इंटरनेटवरून तो ६० अब्जवेळा डाऊनलोड करण्यात आला आहे.

कसा खेळतात हा गेम?
या गेममध्ये प्लेअर विरुद्ध प्लेअर शूटर अशी लढाई असते. या लढाईत शंभरपर्यंत खेळाडू सहभागी होेऊ शकतात. या लढाईत शेवटपर्यंत जो जिवंत राहतो तो जिंकतो. या लढाईत एखादा खेळाडू एकटा, आपल्या मित्रासह किंवा चार मित्रांच्या ग्रुपसह सहभागी होऊ शकतो. समजा ग्रुपने सहभागी झालात आणि तुमचा ग्रुप शेवटपर्यंत जिवंत राहिला तर तुम्ही जिंकलात. या गेममध्ये एक स्टेज पार केल्यानंतर दुसर्‍या स्टेजसाठी आपोआप ओढ लागते. त्यामुळे अनेक किशोरवयीन मुले, तरुण या गेमचे दिवाने होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -