घरताज्या घडामोडीPune Jumbo Covid Hospital: २८ फेब्रुवारीपासून पुण्यातील जम्बो कोव्हिड हॉस्पिटल बंद होणार;...

Pune Jumbo Covid Hospital: २८ फेब्रुवारीपासून पुण्यातील जम्बो कोव्हिड हॉस्पिटल बंद होणार; अजित पवारांची माहिती

Subscribe

सध्या राज्यात कोरोना हळूहळू नियंत्रणात येताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर अनेक निर्बंध शिथिल केले जात आहेत. पुण्यातील रुग्णसंख्येतील वाढ कमी झाल्यामुळे आता पूर्व प्राथमिक शाळा म्हणजेच नर्सरी ते सिनिअर केजी २ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २८ फेब्रुवारीपासून पुण्यातील जम्बो हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली.

अजित पवार म्हणाले की, ‘बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्व प्राथमिक शाळा, ज्याला आपण नर्सरी ते सिनिअर केजी म्हणतो. त्या शाळा २ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यासंदर्भात शिक्षण विभागाने सुरक्षितपणे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्याचे पालन करायचे आहे. त्यामुळे ज्या पालकांना आपल्या मुला-मुलींना नर्सरी ते सिनिअर केजीमध्ये पाठवायचे आहे, ते पालक २ मार्चपासून पाठवू शकतात.’

- Advertisement -

पुढे अजित पवार म्हणाले की, ‘पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे बेड्सची कमतरता निर्माण झाली होती. म्हणून नाईलाजास्तव मुंबई, पुणे, पिंपर चिंचवडमध्ये आपण मोठे जम्बो हॉस्पिटल उभे केले होते. पुण्यात सीओईपीच्या मैदानावर जम्बो हॉस्पिटल उभारण्यात आले होते. आता २८ फेब्रुवारीपासून जम्बो हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

‘आज पुण्याचे महापौर काही कामानिमित्ताने येऊ शकले नाहीत. पण पुण्याच्या महापौरांचीही जम्बो हॉस्पिटल बंद करण्याची मानसिकता आहे. मी पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवड महापौरांसोबत दोन्ही आयुक्तांना बोलायला सांगितले आहे. बैठकीला जे आमदार उपस्थित होते, त्यांनी जम्बो हॉस्पिटल बंद करण्याच्या निर्णयाला संमती दिली आहे. टास्क फोर्सच्या अधिकारी आणि डॉक्टरांनी सांगितले की, आपल्याकडे या वर्षभराच्या काळामध्ये आपण दोन्ही महापालिकेच्या हॉस्पिटलचे नवीन बेड्स तयार केले आहेत. ससूनला मोठ्या प्रमाणात बेड्स तयार झालेले आहेत. त्यामुळे मागेचं ठरलं होत की, तिसऱ्या लाटेपर्यंत बंद करणे थांबवावे. परंतु एकंदरीत रुग्णसंख्या पाहता आता जम्बो हॉस्पिटलची गरज वाटत नाही. त्यामुळे २८ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – India Corona Update: देशातील रुग्णसंख्येत मोठी घट; २४ तासांत ११,४९९ नव्या रुग्णांची वाढ, २५५ जणांचा मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -