घरमहाराष्ट्र...म्हणून भेटले राज ठाकरे सोनिया गांधींना! बैठकीत 'यावर' झाली चर्चा!

…म्हणून भेटले राज ठाकरे सोनिया गांधींना! बैठकीत ‘यावर’ झाली चर्चा!

Subscribe

राज ठाकरेंनी सोनिया गांधींच्या घेतलेल्या भेटीमध्ये नक्की काय झालं? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात होते...पण आता त्या भेटीमध्ये नक्की काय झालं? हे काही खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्तांची दिल्लीत भेट घेतली. मात्र, खरी चर्चा झाली ती त्यांनी घेतलेल्या सोनिया गांधींच्या भेटीची! राज ठाकरे विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेससोबत जाणार इथपासून ते मनसे ईव्हीएमचा निषेध करण्यासाठी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालणार इथपर्यंत चर्चा रंगल्या. पण निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा मनसेचा कोणताही विचार नसून ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभं केलं जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व स्वत: राज ठाकरे करणार असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी २ दिवसांपूर्वी घेतलेली राज ठाकरेंची भेट, मागच्या महिन्यात राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट आणि आता राज ठाकरेंनी थेट सोनिया गांधी यांची घेतलेली भेट, हे याच आंदोलनाच्या पूर्वतयारीचा भाग असल्याचं देखील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समोर आलं आहे. मनसे नेते अनिल शिदोरे आणि सरचिटणीस शिरीष सावंत यावेळी राज ठाकरेंसोबत भेटीसाठी गेले होते.

सोनिया गांधींसोबत काय चर्चा झाली?

दरम्यान, सोनिया गांधींसोबत काँग्रेस-मनसे आघाडीविषयी चर्चा झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झालेली नसून ईव्हीएम विरोधात विरोधी पक्षांचं आंदोलन उभारलं जावं आणि त्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा मिळावा यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबद्दल सोनिया गांधींनी अद्याप जरी कोणतं आश्वासन दिलं नसलं, तरी राज ठाकरेंची भूमिका मात्र त्यांनी ऐकून घेतली आहे. १९७६च्या आणीबाणीच्या काळात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची मुंबईत भेट घेतली होती. या भेटीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी प्रयत्न केले होते. मात्र, राज यांच्या आजच्या सोनिया गांधींसोबतच्या भेटीसाठी काँग्रेसमधून कुणी प्रयत्न केले, हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंच्या विवाहाला सोनिया गांधींचे सल्लागार अहमद पटेल हे जातीने उपस्थित होते. त्यामुळे राज यांची सोनिया गांधी भेटीची शिष्टाई अहमद पटेल यांच्याच माध्यमातून झाल्याचे दिल्ली वर्तुळात बोलले जात आहे. त्यानंतर ठाकरे आणि गांधी घराण्याच्या भेटीचा हा दुसरा प्रसंग असल्यामुळे या भेटीची बरीच चर्चा झाली होती.

- Advertisement -

हेही वाचा – ‘ईव्हीएममध्ये मोठा घोळ’; राज ठाकरेंनी घेतली आयुक्तांची भेट

महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे राज ठाकरे यांना काँग्रेस आघाडीत घेण्यास इच्छुक होते. मात्र, माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम, नसीम खान आणि काही उत्तर भारतीय नेत्यांनी राज यांच्या प्रवेशाला रेड सिग्नल दाखवला होता. त्यामुळे आता राज यांच्या या भेटीमुळे मनसे-काँग्रेस आघाडीची बरीच चर्चा रंगली होती.

राजू शेट्टींचं राज ठाकरेंना साकडं?

राजू शेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या घेतलेल्या भेटीमध्ये ईव्हीएम विरोधातल्या या आंदोलनाचं नेतृत्व राज ठाकरेंनीच करावं, असं साकडं त्यांनी घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये विरोधी पक्षांची एक फळी तयार करून मोठं आंदोलन उभं करण्याचा मानस आहे. मात्र, त्यासाठी सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी झाल्याचं देखील बोललं जात आहे. दरम्यान, मागील महिन्यात राज ठाकरे आणि शरद पवारांची झालेली भेट देखील ईव्हीएम विरोधी आंदोलनाच्याच मोर्चेबांधणीचा एक भाग असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमवरून राज्यात रणकंदन माजण्याची शक्यता आहे हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -