घरमहाराष्ट्र...तर अलिबागचा संपर्क तुटणार

…तर अलिबागचा संपर्क तुटणार

Subscribe

साळाव पुलाची दुरवस्था

सावित्री पुलाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अलिबाग, मुरुड आणि रोहे या तीन तालुक्यांना जोडणार्‍या साळाव पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पुलाची प्रचंड दुरवस्था झाली असून, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलाची वेळेत डागडुजी केली गेली नाही तर जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबागचा संपर्क तुटण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे याकडे लक्ष वेधले जात आहे.

साधारण 510 मीटर लांबीचा साळाव -रेवदंडा खाडी पूल १९८६ साली बांधण्यात आला. त्याला 12 गाळे आहेत. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्यामुळे हा पूल झाला आहे. या पुलाच्या निर्मितीपूर्वी मुंबई, पुणे येथे जाण्यासाठी चणेरे, रोहे, नागोठणे मार्गे वडखळ पेण, तसेच पाली किंवा साळाव जेट्टीवरून छोट्या होड्यांनी (मचवा) रेवदंड्यापर्यंत प्रवास करावा लागत असे. मात्र हा पूल झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था जलदगतीने होऊन विकासाची दारे उघडली गेली. पुलच्या निर्मितीपूर्वी मुरुड तालुका मागासलेला होता. पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर मुरुड तालुक्याचे रूपच पालटले.

- Advertisement -

पर्यटन आणि अन्य अनेक कारणांमुळे महत्त्वपूर्ण ठरलेल्या या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे पुलाला भेग पडून पुलाखालील पाणी वरून स्पष्ट दिसत होते. बांधकाम विभागाने लोखंडी पट्टी लावून त्या ठिकाणी काँक्रिटीकरण केले आणि खड्डे बुजविण्यात आले. पुन्हा नंतर असाच प्रकार घडला. पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्यांचीही दुरवस्था झाल्याने त्याचा काही भाग खाडीत कोसळला आहे. काही ठिकाणी कठड्यावर रानटी रोपे उगवली आहेत. पिलरही धोकादायक अवस्थेत असल्याची बाब समोर येत आहे.

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे छोट्या वाहनांची संख्या वाढलेली असताना अवजड वाहतूकही बिनदिक्कतपणे होत आहे. ही वाहतूक पुलासाठी धोक्याची घंटा वाजवत असल्याने ती बंद करण्याची मागणी वारंवार केली जााऊ लागली आहे. दुर्दैवाने याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे अनर्थ घडण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -