घरमहाराष्ट्रगर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती?

गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती?

Subscribe

स्वत: हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

राज्य सरकारने 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्यापासून राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मास्कसक्तीदेखील मागे घेण्यात आली होती, मात्र या निर्णयाच्या अवघ्या तीन आठवड्यांनंतर पुन्हा राज्यात मास्कसक्ती करण्याच्या निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत: हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्यांची तत्काळ आरटीपीसीआर चाचणी करा, राज्यातील चाचण्यांची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचनाही दिल्या. आपण केंद्र शासनाकडे लसीकरण सक्तीचे करण्याबाबत तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बुस्टर डोस देताना ९ महिन्याचा कालावधी कमी करण्याबाबत पत्र पाठवणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत कोरोना स्थितीचा आढावा घेत चिंता व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी संवाद साधून कोविड स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला टास्कफोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य शशांक जोशी डॉ. राहुल पंडित यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी बोलताना, कोरोना अजून संपलेला नाही, जगभरात त्याचे नवनवीन विषाणू जन्माला येत आहेत. चीनमध्ये ४० कोटी जनता सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. आपणही कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे मुकाबला केला असला तरी आपल्या काही आप्तस्वकीयांना गमावले आहे. यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार या काळात गेले. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोविड अनकूल वर्तणूक अंगिकारणे आवश्यक आहे. राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरु केलेल्या आरोग्य सुविधा आपण बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, अशी आपली प्रार्थना असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

चिंता करण्याचे कारण नाही-राजेश टोपे
राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, राज्यात कोरोना रुग्णांबाबत चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने सध्या महाराष्ट्र सुरक्षित स्थितीत आहे. राज्यात सद्यस्थितीत केवळ ९२९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राने याआधी एकाच दिवशी ६५ ते ७० हजारांपर्यंत रुग्णसंख्या बघितलेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक दशलक्ष लोकसंख्येमागे आढळणार्‍या रुग्णांमध्ये सध्या आपला आकडा खूप कमी आहे, मात्र केंद्र सरकारकडून ज्या काही उपाययोजना करण्यास सांगण्यात आल्या आहेत, त्या आपण तत्काळ करू, असे राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

ओमायक्रॉन व्हेरिएंटचेच रुग्ण
आपल्या देशात सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचेच काही रुग्ण आहेत. नव्याने येणारे व्हेरिएंटदेखील ओमायक्रॉनचाच भाग आहे. नव्या व्हेरिएंटचे अद्याप कुठलेही रुग्ण आपल्याकडे आढळलेले नाहीत. राज्यात सध्या 25 हजार चाचण्या सुरू आहेत. 6 ते 12 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रापुढे ही एक मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी आवश्यक नियमावली प्राप्त झाल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. 12 ते 15 वयोगट आणि 15 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी पालक तसेच शाळेतील शिक्षकांना विश्वासात घेऊन लसीकरणाचा वेग वाढवण्यात येईल, असेही राजेश टोपे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -