घरमहाराष्ट्रदरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग

दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग

Subscribe

दोनजण जेरबंद, तिघे फरार

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा सिनेस्टाईल पाठलाग करीत पेण-खोपोली मार्गावरील आंबेगाव पेट्रोल पंपासमोर पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. तर तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. दरोडेखोरांना पकडताना पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याची चर्चा दिवसभर दूरचित्रवाहिन्यांसह सोशल मीडियावर रंगली होती, मात्र पोलिसांकडून त्याला दुजोरा मिळालेला नाही.

येथील म्हाडा कॉलनी येथे राहणारे कौस्तुभ भिडे यांची नवीन कोरी व अद्याप नोंदणी न झालेली मारुती इको व्हॅन बुधवारी रात्री त्यांच्या घरा समोरून चोरीला गेली होती. याबाबत पोलिसांचा तपास सुरू असताना गुरुवारी रात्री एक इको व्हॅन संशयादस्पदरित्या शहरात फिरत असल्याची माहिती सीसीटीव्हीद्वारे मिळाली. त्यानुसार उप अधीक्षक नितीन जाधव, पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, उपनिरीक्षक दिलीप वेडे, महेंद्र कदम, रवींद्र मुंडे, सदानंद जिर्‍हाडकर, अमर पवार, कमळ दोरे यांच्या पथकाने शोध सुरू केला असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही गाडी पेण-खोपोली मार्गावर बाह्यवळण रस्त्यावर आढळून आली. पोलिसांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गाडी पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या एका ट्रेलरला मागून जाऊन जोरदार धडकली.

- Advertisement -

यावेळी व्हॅनमधील चौघा दरोडेखोरांनी आंबेगाव जवळील जंगलात पळ काढला, तर एकाने उप निरीक्षक कदम यांच्यावर सुर्‍याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्याला जागेवरच पकडण्यात आले, तर दुसर्‍या एका दरोडेखोराला जंगलातून हुडकून काढण्यात आले. सुभाष मोहन पवार (42, जुना कवठा रामनगर, जि. नांदेड) व अनिलसिंग गुलाबसिंग दुधानी (कानसई रोड, अंबरनाथ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे चोरलेल्या व्हॅनसह चार कटावण्या, दोन चाकू, गॅस कटर, दोन सिलिंडर, सुरा, लोखंडी पाने, तसेच एमएच 05 एस 2039 या क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 11 लाख 4 हजार 985 रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी जंगल परिसर पिंजून काढला, मात्र तिघेजण सापडले नाहीत. आरोपींवर पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई येथे जबरी दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी ते जामिनावर सुटले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व तपासाबाबत मार्गदर्शन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -