घरमहाराष्ट्र"हे घातक धोरण..." निधी वाटपाच्या मुद्द्यावरून संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर संतापले

“हे घातक धोरण…” निधी वाटपाच्या मुद्द्यावरून संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर संतापले

Subscribe

राज्यात निधी वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना आता विरोधातील आमदारांना मात्र फारसा निधी देण्यात आलेला नाही. ज्यामुळे या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

मुंबई : राज्याच्या तिजोरीच्या चाव्या या पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात आल्या आहेत. अजित पवार यांना अर्थ खाते देण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांनी केली होती. पण तरी देखील त्यांच्या या मागणीकडे कानाडोळा करत दिल्लीत बसलेल्या हायकमांडच्या आदेशावरून अजित पवार यांना हेच खाते देण्यात आले आहे. ज्यानंतर या पदावर कार्यरत होताच अजित पवार हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी या पदाची सूत्रे हातात घेताच त्यांच्या आमदारांवर निधीचा वर्षाव केला आहे. तर शिंदेंच्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना देखील भरपूर निधी दिला आहे. पण राष्ट्रवादीच्या आमदारांच्या तुलनेत हा निधी कमी असल्याचे बोलले जात आहे. राज्यात निधी वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना आता विरोधातील आमदारांना मात्र फारसा निधी देण्यात आलेला नाही. ज्यामुळे या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. (Sanjay Raut was angry with the rulers over the issue of allocation of funds)

हेही वाचा – संजय राऊतांच्या निशाण्यावर आता अण्णा हजारे, म्हणाले…

- Advertisement -

निधी वाटपाच्या मुद्द्यावरून बोलताना संजय राऊत म्हणाले की, समान नागरी कायदा जर का सरकार आणत आहे, तर तो सर्व बाबतीत आणायला हवा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना निधी दिला. देवेंद्र फडणवीस त्यांच्या आमदारांना भरघोस निधी देत आहेत. आता अजित पवार अर्थमंत्री झाले आहेत, ते त्यांच्या गटाच्या आमदारांना निधी देत आहेत. मग जे सत्तेत नसलेले आमदार आहेत. यामध्ये काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) किंवा खऱ्या राष्ट्रवादीचे आमदार असतील. त्यांना निधी कोण देणार? ते लोकांचे प्रतिनिधीत्व करत नाहीत का? ते या राज्याचे विधिमंडळात नेतृत्व करत नाहीत का? त्यांना आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याचा अधिकार नाही का? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले.

तसेच, जे आमदार सत्तेत नाहीत ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी सुद्धा घटनेनुसार शपथ घेतली आहे. पण या देशामध्ये जो आमच्याबरोबर येईल. तो भ्रष्ट असेल किंवा व्यभिचारी असेल, जो आमच्या पक्षात येईल, त्यालाच फक्त विकासकामांसाठी निधी दिला जाईल, बाकीच्यांना नाही. हे जे धोरण आहे. ते अत्यंत घातक आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या भेटीवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यात आता दुसरे काही राहिले नाही. काही दिवसांनी ते जो बायडन, ऋषी सुनक किंवा अन्य कोणालाही भेटायला जातील. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर ते काम करत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार आल्यापासून शिंदे यांचे आसन अस्थिर झाले आहे, त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद जाणार, असे मी नाही तर त्यांचीच लोक बोलत आहेत, असेही राऊतांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -