घरमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या निशाण्यावर आता अण्णा हजारे, म्हणाले...

संजय राऊतांच्या निशाण्यावर आता अण्णा हजारे, म्हणाले…

Subscribe

मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश जागा झाला आहे. पण अण्णांनी महाराष्ट्रातील भ्रष्टाचारावर आणि राजकीय घडामोडींवर आवाज उठवायला हवा होता, असे म्हणत राऊतांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर सर्वच राज्यांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कायदे कडक करावेत, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देखील या घटनेवरून मत व्यक्त करत आवाज उठवला आहे. परंतु या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश जागा झाला आहे. पण अण्णांनी महाराष्ट्रातील भ्रष्टाचारावर आणि राजकीय घडामोडींवर आवाज उठवायला हवा होता, असे म्हणत राऊतांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. (Sanjay Raut targeted Anna Hazare on the issue of corruption)

हेही वाचा – दीपक केसरकरांच्या ‘त्या’ निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने ओढले ताशेरे, काय आहे प्रकरण?

- Advertisement -

आज प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील भ्रष्टाचारावर अण्णा काही तरी बोलतील असे वाटले होते. तशी मागणी पण आम्ही केली होती, पण त्यांनी थेट मणिपूरच्या घटनेमध्ये हात घातला. खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना देशामध्ये खूप घडत आहेत. जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केले. पण अण्णा हजारे हे देशाला माहीत झाले ते भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे नेते म्हणून, असे राऊतांकडून सांगण्यात आले.

आज महाराष्ट्रात काय सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपने ज्यांच्यावर पुराव्यासहित आरोप केले, ते सगळे लोक राज्याच्या मंत्रिमंडळात शपथ घेऊन मंत्री झाले आहेत. अण्णा हजारे यांनी याच्यावर आवाज उठवला पाहिजे. अजित पवार असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा शिवसेनेकडून बेईमानी करून गेलेले जे आता मंत्री झाले आहेत, ते असतील. या सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे शेकडो कोटी रुपयांचे गंभीर आरोप आहेत. अण्णा हजारेंनी या विषयावरती भूमिका व्यक्त करून एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर राहू, असे आवाहन संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांना केले आहे.

- Advertisement -

मणिपूर या देशावर आख्खा देश जागा झाला आहे. अण्णा बोलत आहेत, ते ठीक आहे. इतर अनेक विषय महिलांच्या बाबतीत दिल्लीत घडले. महिला कुस्तीपटूंनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाचा थेट भाजपशी संबंध होता. अण्णा त्याच्यावर बोलतील याची आम्ही वाट बघत होतो. ते काही तरी भूमिका घेतील. महाराष्ट्रावरून सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्कार करत आहेत, असे म्हणत राऊतांनी सरकारवर टीका केली.

अण्णांची जी ओळख आहे, जी प्रतिमा आहे ती भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारी आहे. त्यामुळे माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही नेहमी देश वाचविण्याची भूमिका घेतली आहे. तुम्ही रामलीला मैदान, जंतरमंतरवर भ्रष्टाचाराच्याविरोधात आंदोलन करून देशाला जागे केले होते. अण्णांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले म्हणून आज भाजप सत्तेत आले आहे. आज त्याच भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णांनी रणशिंग फुंकणे गरजेचे आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

अण्णा हजारे यांनी देशात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. ज्यानंतर भाजपची सत्ता आली. परंतु, त्यानंतर अण्णांनी कोणत्याही मुद्द्यावरून आंदोलन केले नाही, ज्यामुळे विरोधक अण्णांवर निशाणा साधत असतात. पण बऱ्याच महिन्यांनी अण्णांनी आवाज उठवल्यामुळे भाजपच्या भ्रष्टाचारावर त्यांनी बोलावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -